साकुर्डे गाव पाणीदार करणारच!

जेजुरी- पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी आज (शुक्रवारी) साकुर्डे येथे ग्रामस्थांसह तासभर श्रमदान करून सुमारे 15 मीटर लांबीचा आणि पाच फुट उंचीचा एक दगडी बांध तयार केला. त्यांच्या सहभागामुळे ग्रामस्थांत ही उत्साह निर्माण झाला असून “आम्ही आमचा गाव पाणीदार करणारच’ असा विश्‍वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द देसाई यांनी ग्रामस्थांना दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी पुरंदर पंचायत समीतीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण आणि काही ग्रामसेवकांसह साकुर्डे येथील पाणी फाउंडेशनच्या कामाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसह श्रमदान ही केले. यावेळी बोलताना त्यांनी येथील गेल्या दीड महिन्यात केलेल्या कामाची पाहणी केली असता ग्रामस्थांनी शासकीय दरानुसार सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये खर्चाचे काम उभे केले आहे. यामागची गाव पाणीदार करण्याची ग्रामस्थांची भावना ही अत्यंत स्फृर्तीदायक व इतरांना मार्गदर्शक ठरणारी आहे. गावागावात अशा प्रकारचा लोकसहभाग असेल तर प्रशासन ही पुढे येवून मदत करते. येथील ग्रामस्थांच्या श्रमदानाला पुरंदर पंचायत समीती पातळीवरून सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांना दिल्या, त्याचबरोबर ग्रामस्थांनी ही येत्या आठवडाभरत 100 टक्के शोषखड्डे करून गटविकास अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साकुर्डे गावाला सर्वतोपरी सहकार्य आपण करू असे आश्‍वासन ही त्यांनी दिले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे पुरंदरचे समन्वयक सुरेश सस्ते, पुरंदर पंचायत समीतीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, सरपंच तृप्ती जगताप, सदस्या सविता जगताप, ज्योती सस्ते, पोपट जगताप, शिवराज सस्ते, पाणी फाउंडेशनचे रघुनाथ जगताप, अमीर पटेल, लालमुहम्मद पठाण, अक्षय बनकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)