साकारतंय पहिलं त्रिमितीय घर (भाग-२)

सिमेंट कॉंक्रिटचा वापर गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढला असून, सिमेंटच्या उत्पादन प्रक्रियेत हरितगृह वायूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. या पार्श्‍वभूमीवर थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानातून घर साकारण्याची संकल्पना केवळ अद्‌भुत नसून, ती पर्यावरणपूरक ठरू शकते. व्यावसायिक पातळीवरील असा पहिला गृहप्रकल्प नेदरलॅंडमध्ये आकाराला येत असून, 2019 पर्यंत पूर्ण होऊ शकणाऱ्या या इमारतीत पाच घरे असतील. वाढत्या प्रदूषणाच्या पातळीवर या अद्‌भुत आविष्काराचा परिचय करून घेणे अगत्याचे ठरेल.

साकारतंय पहिलं त्रिमितीय घर (भाग-१)

पहिल्या टप्प्यात आइंडोवन विद्यापीठाकडून या घराचे स्ट्रक्‍चर उभारण्यास सुरुवात होईल. नंतर हे स्ट्रक्‍चर साइटवर आणून त्याची जुळणी (असेम्ब्ली) केली जाईल. नंतर या घरांना खिडक्‍या, दरवाजे, छत आणि वायर्स जोडण्यात येतील. डिझाइन तयार करणाऱ्यांच्या मते, या योजनेमुळे थ्री-डी प्रिंटिंग कॉंक्रिट संकल्पनेचे पर्यावरणीय फायदे जगासमोर येतील. पहिले घर एकमजली असेल आणि त्यात तीन खोल्या असतील. याखेरीज स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि बाथरूम असेल. या घराचे छप्पर लाकडी असेल. अन्य चार घरे बांधण्यास याच वर्षी प्रारंभ होत असून, पहिले घर 2019 च्या मध्यापर्यंत बांधून तयार होईल, अशी आशा आहे. थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे बांधलेल्या घराची किंमत किती असेल, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

सद्यःस्थितीत रहिवासी विभागांत घरांची असलेली मागणी पूर्ण करणे हा या तंत्रज्ञानाचा हेतू आहे. अद्याप या घराची किंमत निश्‍चित होऊ शकलेली नसली, तरी प्रत्येक उत्पन्नगटातील व्यक्तीला कमी किमतीत चांगल्या सुविधा आणि उत्तम डिझाइन असलेले घर मिळावे, हाही या उपक्रमाचा उद्देश आहे. घरांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या ही घरे विकत घेतील आणि ज्यांना गरज आहे, त्यांना ती भाड्याने देतील. या प्रकल्पाला “माइलस्टोन डेव्हलपमेन्ट’ असे नाव दिले गेले आहे. देशभरात पुढील पाच वर्षांत थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बांधलेल्या घरांची संख्या वाढेल, हे समजल्यापासून नेदरलॅंडमधील या क्षेत्रातील जाणकार खुशीत आहेत. तोपर्यंत सुमारे पाच टक्के घरे या तंत्रज्ञानाच्या साह्याने बांधलेली असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेदरलॅंडमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात करण्याचे एक कारण गरज हेही आहे. कारण तेथील बांधकाम क्षेत्रात कामगारांचा मोठा तुटवडा आहे.

थ्री-डी प्रिंटिंगमध्ये वापरण्यात येणारा प्रिंटर डिजिटल बिल्डिंग तंत्रज्ञानावर आधारित असतो. या प्रिंटरच्या माध्यमातून थरावर थर या तंत्राने वस्तूची निर्मिती केली जाते; परंतु प्रत्येक थराबरोबर उंची किंवा जाडी वाढत जाते आणि त्यातून वस्तूची निर्मिती होते. बांधकामासाठी कमीत कमी बांधकाम साहित्य खर्ची पडावे आणि लोकांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा मिळाव्यात, हाच थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ नेदरलॅंडमध्ये भरभरून घेता येणे शक्‍य आहे, कारण सरकार आणि कंपन्या एकत्र येऊन प्रकल्पांवर काम करीत आहेत. थ्री-डी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांच्या संख्येत या देशात सातत्याने भर पडत आहे. 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये थ्री-डी प्रिंटिंगच्या विक्रीत या देशात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात या देशात थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानात काम करू इच्छिणाऱ्या बारा स्टार्टअप्सचे विलीनीकरण करण्यात आले.

– अमोल पवार (कॅलिफोर्निया)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)