साकारतंय पहिलं त्रिमितीय घर (भाग-१)

सिमेंट कॉंक्रिटचा वापर गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढला असून, सिमेंटच्या उत्पादन प्रक्रियेत हरितगृह वायूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. या पार्श्‍वभूमीवर थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानातून घर साकारण्याची संकल्पना केवळ अद्‌भुत नसून, ती पर्यावरणपूरक ठरू शकते. व्यावसायिक पातळीवरील असा पहिला गृहप्रकल्प नेदरलॅंडमध्ये आकाराला येत असून, 2019 पर्यंत पूर्ण होऊ शकणाऱ्या या इमारतीत पाच घरे असतील. वाढत्या प्रदूषणाच्या पातळीवर या अद्‌भुत आविष्काराचा परिचय करून घेणे अगत्याचे ठरेल.

विज्ञानात आज हरघडी वेगवेगळे शोध लागताना दिसतात. कालचे आज जुने होते आणि आज नवेच काहीतरी हाती गवसते. त्यादृष्टीने पाहिल्यास विज्ञानाची दुनिया अंतहीन, अमर्याद आहे. कधी, कोणता वेगळा शोध लागेल, याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. कालपर्यंत अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी आज शक्‍य होताना दिसतात. जगातील अनेक शोध शास्त्रज्ञांना असे अचानकच लागले आहेत; परंतु आपण ज्या आविष्काराची चर्चा करतो आहोत, तो मात्र अचानक लागलेला शोध नाही. शास्त्रज्ञानी विचारपूर्वक रणनीती निश्‍चित करून सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांचा परिपाक आहे. नेदरलॅंडमध्ये जगातील पहिले प्रिंटेड थ्री-डी घर तयार होत आहे. 2019 पर्यंत हे घर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आइंडोन शहरातील बोरजिसिक भागात हे घर तयार होत आहे.

आइंडोन हे दक्षिण नेदरलॅंडमधील एक डच शहर आहे. तंत्रज्ञानातील आणि डिझाइनिंग क्षेत्रातील हब म्हणून हे शहर ओळखले जाते. या शहरात एकाच जमिनीवर पाच घरे बांधण्यात येतील. ही घरे थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या साह्याने बांधली जात आहेत. सध्या या घरांचे संकल्पचित्र जारी करण्यात आले आहे. सध्या वाढत्या प्रदूषणाची जगभरात चर्चा सुरू असून, सर्वचजण निसर्गाच्या प्रकोपामुळे हैराण झाले आहेत; परंतु सिमेंट कॉंक्रिटच्या वाढत्या वापरामुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे, कारण सिमेंट कॉंक्रिट ही गेल्या काही दशकांमध्ये सर्वाधिक वापरात आलेली वस्तू आहे. या पार्श्‍वभूमीवर, सिमेंट कॉंक्रिटचा वापर टाळून घरे बांधण्याची संकल्पना केवळ अद्‌भुत नसून, ती निसर्गपूरक ठरू शकते.

साकारतंय पहिलं त्रिमितीय घर (भाग-२)

आइंडोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि ह्यूबन अँड वॅन्स मिर्लो आर्किटेक्‍टन कंपनी यांच्या सहयोगातून हे पहिलेवहिले थ्री-डी घर बांधले जात आहे. एकूण पाच घरे एकाच जागी उभारली जाणार असून, ही संकल्पना भविष्यात “गेम चेंजर’ म्हणून नावारूपाला येईल, अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे. थ्री-डी प्रिंटेड घरांच्या निर्मितीला या आविष्कारामुळे चालना मिळेल, अशीही त्यांना खात्री आहे. या घराच्या निर्मात्या चमूने दिलेल्या माहितीनुसार, क्वर्की आकाराचे हे घर असेल. ओबडधोबड दगडांसारखा या घरांचा आकार असेल आणि प्रशस्त हिरवळीवर हे घर उभे केले जाईल. या घराचे बांधकाम अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.

– अमोल पवार (कॅलिफोर्निया)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)