साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी धारेवर

खासदार सदाशिव लोखंडेंचा आक्रमक पवित्रा : रुग्णालय परिसरात स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना

शिर्डी – साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील प्रथमदर्शनी भिंतीवर रुग्णांचे कपडे वाळत घातले. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरल्याचे सांगून ही बाब संस्थानच्या दृष्टीने अतिशय निंदनीय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासणारी ही बाब आहे, अशा शब्दात खासदार सदाशिव लोखंडे यांनी संताप व्यक्‍त केला. येथील स्वच्छतेकडेही रुग्णालय व्यवस्थापणाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

खा. लोखंडे गुरुवारी सकाळी साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात खाजगी कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांना रुग्णालय परिसरात असे चित्र दिसले. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन कोते, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दशरथ गव्हाणे, शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले आदी यावेळी उपस्थित होते.
खा. लोखंडे तेथे आले असता त्यांना रुग्णालयाच्या प्रथमदर्शनी प्रवेशद्वारासमोरील भिंतीवर शेकडो रुग्ण, नातेवाईकांचे कपडे वाळत घातल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथे प्रचंड दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. तातडीने रुग्णालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. प्रशांत नरोडे यांना प्रवेशद्वारासमोर बोलावून त्यांची कानउघडणी केली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरोडे यांनी संबधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून स्वच्छतेसंदर्भात सूचना केल्या.

रुग्णालय कारभार सुधारणार कधी : चौगुले
सरकारी रुग्णालयापेक्षा साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णायाची दयनीय अवस्था झाली आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा केली. त्यांचा वसा चालू ठेवण्यासाठी संस्थानने रुग्णालये सुरू केली. मध्यंतरीच्या काळात रुग्णालये गोरगरिबांचा आधारवड बनले. राज्याबाहेर या रुग्णालयांची महती पोहचली मात्र प्रशासन, व्यवस्थापन मंडळाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाची वाताहत झाली. यातून रुग्णांचे हाल होत आहेत. केसपेपर काढण्यासाठी तास्‌न तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही डॉक्‍टरांची वेळ संपून जाते. डॉक्‍टर मिळाले तर तपासणीसाठी वेळ मिळत नसल्याने रुग्णांना हेलपाटे मारण्याची वेळ येते. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा कधी होणार? असा सवाल शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)