साईबाबा संस्थान हावरे प्रायव्हेट लिमिटेड नव्हे!

कैलास कोते यांची टीका : संस्थानचा निधी बाहेरील संस्थांना देण्यास शिर्डीतील नागरिकांचा विरोध
शिर्डी – साईबाबा संस्थान म्हणजे हावरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हे, अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते कैलास कोते यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्यावर केली. संस्थानचा 71 कोटींचा निधी बाहेर जाऊ देणार नाही, प्रसंगी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, असा इशारा देत संस्थान प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी प्रश्‍नचिन्ह निर्माण केले.
साई संस्थानकडून बाहेरील संस्थांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी शिर्डीतील नागरिकांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. यावेळी कोते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास गोंदकर, बाबासाहेब कोते, भाऊसाहेब कातोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, जमादार इनामदार, अप्पासाहेब कोते, साई निर्माणचे विजय कोते, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, गटनेते अशोक गोंदकर, नितीन कोते, मंगेश त्रिभुवन, जगन्नाथ गोंदकर, हरिश्‍चंद्र कोते, दत्तात्रय कोते, पोपट शिंदे, गणपत गोंदकर, अशोक कोते, सेवा संस्था अध्यक्ष साईराम गोंदकर, युवक कॉंग्रेसचे ताराचंद कोते, आदी उपस्थित होते.
विजय कोते यांनी बैठकीची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, साईबाबा संस्थान बाहेरील रुग्णालयांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत आहे. मात्र शिर्डी येथील संस्थानच्या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप विजय कोते यांनी केला. प्रथम दोन्ही रुग्णालये सुसज्ज बनवण्यात यावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कैलास कोते म्हणाले, साईबाबा संस्थान म्हणजे हावरे प्रायव्हेट कंपनी नव्हे. संस्थानचा निधी बाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी आमची तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी आहे. 71 कोटी रुपयांचा निधी विदर्भातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिला जातो. मात्र संस्थानच्या रुग्णालयात यंत्रणेअभावी रुग्णसेवा विस्कळीत झाली. तसेच 200 कोटीचा निधी बाहेर देण्यासंबंधित प्रस्ताव तयार आहे. कोणत्याही प्रकारचा निधी बाहेर जाऊ देणार नाही, अशी आमची भूमिका असल्याचे कोते म्हणाले.
माजी विश्‍वस्त देवराम पवार यांनी संस्थानच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. “गाव ठेवी उपाशी टीळा लावी काशी’ अशी टीका त्यांनी केली. निमगाव येथील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब कातोरे म्हणाले, साईबाबा संस्थान शिर्डी नागरिकांचे आहे. हावरेंच्या बापाचे नाही, संस्थानच्या हजारो कोटींच्या ठेवींवर विश्‍वस्त मंडळाने डोळा ठेऊन निधी पळवायचे काम सुरू केले आहे. त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो.
नितीन कोते म्हणाले, शिर्डीच्या विकासासाठी सर्वांनी गटतट विसरून एकत्र यावे.नगरसेवक हरिश्‍चंद्र कोते म्हणाले, संस्थानच्या रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. आता हावरेंनी पोपटपंची बंद करावी. जमादार इनामदार यांनी संस्थानवर जोरदार हल्ला चढविला. साईबाबा मंदिरासह परिसर भगवामय करून टाकल्याने साईबाबा यांनी जगाला दिलेल्या सर्वधर्म समभावाच्या शिकवणीला हरताळ फासला जात असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी भानुदास गोंदकर, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, फकीर लोढा, चौधरी यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

…म्हणून शिर्डीचा प्रथम क्रमांक हुकला
मुख्यमंत्र्यांनी हावरेंना राज्यमंत्रीपदाऐवजी मार्केटिंग मंत्र्याची माळ गळ्यात घातली पाहिजे. शिर्डी नगरपंचायातला स्वच्छ संरक्षण अभियानसाठी संस्थानकडून मिळणारा निधी मिळाला नाही. त्यामुळे आमचा प्रथम क्रमांक हुकला. नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम हावरे आणि त्यांचे विश्‍वस्त मंडळ करीत असल्याची टीका सुजीत गोंदकर यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)