साईबाबा ग्रामीण पतसंस्थेत 2 कोटी रुपयांचा अपहार

संगमनेर, दि. 18 (शहर प्रतिनिधी)- तालुक्‍यातील साकूरच्या बिरेवाडी, मांडवे येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेत 2 कोटी 16 लाख 916 रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. हा अपहार मॅनेजर व कॅशिअर यांनी केला असून ते दोघेही मुख्य सूत्रधार फरार झाले आहेत. यासंदर्भात घारगाव पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साकूरच्या बिरेवाडी, मांडवे येथील साईबाबा पतसंस्थेत मॅनेजर रावसाहेब कारभारी टेकुडे व कॅशिअर सीताराम मनोहर शेंडगे हे काम पाहतात. या दोघांनी मिळून दि. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत चेकवर खोट्या सह्या करून तसेच साकूर येथील जिल्हा बॅंकेतील लॉकरमधून सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला. जवळपास 2 कोटी 16 लाख 916 रुपयांचा गैरव्यवहार ऑडिट केल्यानंतर पुढे आला आहे. त्यांनी एवढेच न करता संचालक मंडळाचा ठराव, बॅंक खात्यातील चेकवर खोट्या सह्या, तसेच अधिकाराचा गैरवापर करून रकमा व सोन्याचे दागिने काढले. याचा कुठलाही हिशोब पतसंस्थेत जमा केला नाही.
यासंदर्भात प्रमाणित लेखापरीक्षक संतोष रंगनाथ पंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मॅनेजर रावसाहेब टेकुडे, रा. पारनेर व कॅशिअर सीताराम शेंडगे, रा. मांडवे यांच्यावर गु.र.नं. 49/17 भादंवि कलम 420, 403, 405, 409, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही फरार असून त्यांचा शोध तालुका पोलीस घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास पो. नि. दिलीपराव निघोट करीत आहेत.
दरम्यान, साईबाबा पतसंस्थेतील गैरव्यवहार महिनाभरापूर्वीच समोर आला होता. मात्र, संचालक मंडळाच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणात चालढकल करण्यात आली. ठेवीदारांचे पैसे अडकल्याने ते मिळण्यासाठी आंदोलनही करण्यात आले. एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होवूनही संचालक मंडळ गप्प का बसले होते, हा प्रश्‍नच आहे. या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी व विद्यमान संचालक मंडळाला यात जबाबदार धरून कारवाई व्हावी, अशी मागणी ठेवीदार व सभासदांनी केली आहे. पतसंस्थेतून परस्पर पैसे काढले गेल्याने ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)