साईपालखी ठेवण्यास संस्थानने मज्जाव केल्याने पदयात्रींचा रास्तारोको

साईसेवक मंडळाच्या पदयात्रींची आक्रमक भूमिका; प्रशासन निर्णयावर ठाम

शिर्डी – गर्दीचे नियोजन व साईमंदिर सुरक्षेच्या कारणास्तव साईबाबा संस्थान प्रशासनाने साईबाबा मंदिर परिसरातील लेंडीबागेत साईपालखी ठेवण्यास मज्जाव केल्याने संस्थान प्रशासन व साईसेवक मंडळाचे पदयात्री यांच्यात तात्विक वाद निर्माण झाला. साईसंस्थान लेंडीबागेत पालखी ठेवण्यास केलेली बंदी यावर ठाम राहिल्याने तसेच साईसेवक मंडळाने गेल्या अनेक वर्षांची परंपरा शताब्दी वर्षात खंडित करू नये, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त भक्तांनी नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन सुरू केले असून किमान 25 भक्तांना लेंडीबागेत प्रवेश देऊन पालखीसमोर पारायण करू द्या, अशी मागणी पूर्ण केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान, यावर रात्री उशिरापर्यंत निर्णय न झाल्याने शिर्डीत तणावपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जशी रात्र होत गेली तसा तणाव वाढत गेला. पालखी रस्त्यावर ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती.

मुंबई येथून गेल्या 37 वर्षांपासून श्री साईसेवक मंडळाची मानाची पालखी रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत येत असते. यंदाही सालाबादप्रमाणे पदयात्री साईपालखी घेऊन शिर्डीत दाखल झाले. सुमारे आठ हजाराहून अधिक संख्या असलेली पालखी साईमंदिरासमोरील एक नंबर गेटसमोर आली. या भक्तांनी यामागील परंपरेप्रमाणे लेंडीबागेत साईपालखी ठेवू द्यावी, अशी एकमुखी मागणी केली. संस्थान प्रशासनाने त्यांची मागणी धुडकावून लावल्याने संतप्त झालेल्या भाविकांनी नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या मांडून रास्तारोको आंदोलन सुरू केले. साईनामाच्या जयघोषात त्यांनी आंदोलन सुरू केले. यावेळी साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते, नगरसेवक अभय शेळके यांनी पालखीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भक्तगण आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले.

या ठिकाणी उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, धनंजय निकम, साईसंस्थान सुरक्षा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पो. नि. मधुकर गंगावणे, कोपरगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, शिर्डी पोलीस स्टेशनचे पो. नि. प्रताप इंगळे, पो. नि. दौलतराव जाधव, आदींसह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, साईमंदिर परिसरात भाविकांची गर्दी होणार नाही, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात कोणत्याही पदयात्रींच्या साईपालखीस परवानगी देता येणार नाही. उत्सवानिमित्त सुमारे दोनशे पालख्या येणार आहेत. एका पालखीस परवानगी दिली तर अन्य पालखीतील भक्तांना परवानगी द्यावी लागेल. जिल्हा पोलीसप्रमुखांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. साईसंस्थानने पालखी ठेवण्यासाठी जुन्या प्रसादालयाच्या ठिकाणी व्यवस्था केली असून या ठिकाणी पाणी, जेवण, नाश्‍ता, आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. साईसेवक मंडळाच्या पालखीस लेंडी बागेऐवजी मंदिरालगत असणा-या 16 गुंठे जागेत असणा-या भव्य शेडमध्ये परवानगी दिली जाईल. त्यांनी या ठिकाणी 25 काय सर्वच पदयात्रींना बसविण्यास हरकत नाही. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. साईसेवक मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांनी सांगितले की, गेल्या 37 वर्षांपासून साईसेवक मंडळाची पालखी रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीत येत असते. सुरुवातीपासून मंदिर परिसरातील लेंडीबागेत पालखी ठेवण्याची आमची परंपरा आहे. यावर्षी साईसमाधी शताब्दी वर्ष असल्याने किमान यावर्षी तरी ही परंपरा खंडित करू नये, अशी हात जोडून विनंती केली. पालखीतील अन्य पदयात्री मंदिर परिसराच्या बाहेर राहतील. किमान 25 भाविकांना पारायण करण्यासाठी साईपालखी लेंडीबागेत ठेवण्याची परवानगी द्यावी. आमच्याकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही.अन्य भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. साईबाबांच्या प्रचार-प्रसारासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सुरू केली असून, मानाची पालखी असल्याने किमान यावर्षी तरी परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनास केली. मात्र, संस्थानचे प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यांची या ठिकाणाहून काढता पाय घेत आपले रास्तारोको आंदोलन सुरू ठेवले.

यावेळी नगरसेवक अभय शेळके यांनी आपली भूमिका व्यक्त करताना सांगितले की, साईबाबा संस्थान प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेली भूमिका योग्य असल्याने भक्तांनी बाबांच्या श्रध्दा सबुरी या शिकवणीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून संयम पाळावा. रास्तारोको करून अन्य भक्तांना वेठीस धरू नये. जर पदयात्रींनी आपली भूमिका ताठर ठेवली तर पोलीस प्रशासन, संस्थान प्रशासन व शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.

साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी साईसंस्थान प्रशासनास विनंती करत या मानाच्या पालखीस यंदा लेंडीबागेत पालखी ठेवण्याची परवानगी माणुसकीच्या भावनेतून द्यावी, अशी विनंती केली. बाबांच्या श्रध्देपोटी भाविक शिर्डीला येतात. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. पालखीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे किमान 25 भक्तांना पालखीसह लेंडीबागेत बसण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका व्यक्त केली. दरम्यान, साईसंस्थान प्रशासन आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने व साईसेवक मंडळाचे भक्तगण आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तणाव वाढला. भक्तांनी पुन्हा रस्त्यावर ठिय्या मांडून साईनामाचा जयघोष करत आंदोलन तीव्र केले. जोपर्यंत लेंडीबागेत पालखी ठेवण्यास परवानगी मिळत नाही तोपर्यंत नगर-मनमार रस्त्यावर पालखी ठेवून याच ठिकाणी ठिय्या मांडला जाईल, असा इशारा दिला. यामुळे रात्री 8.30 वाजेपर्यंत कोणताही निर्णय झाला नव्हता. किमान दोन तासांपेक्षा अधिक वेळ रास्तारोको केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पालखीतील भक्तांची गर्दी व वाहनांची गर्दी यामुळे सर्व काही विस्कळीत झाले होते. तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, आदी ठिकाणांहून पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)