सांस्कृतिक क्षेत्रासाठी ‘समृद्ध’ ठरले 2018 चे वर्ष

– कल्याणी फडके

पुणे – सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमांनी शिरपेचात मानाचा तुरा रोवला. “अरे… आव्वाज कुणाचा’ अशा आरोळ्यांनी “पुरुषोत्तम करंडक’, “फिरोदिया करंडक’,”भरत करंडक’,”राज्यनाट्य स्पर्धा’ आदी करंडकांनी नाट्य क्षेत्राच्या इतिहासामध्ये मोहोर उमटवली. कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये सादर झालेल्या कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद दिली. सांस्कृतिक क्षेत्रासाठी हे वर्ष खऱ्या अर्थाने “समृद्ध’ झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. अरुणा ढेरे संमेलनाध्यक्षपदी
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 92व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली. जुनी निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्यानंतर नव्या प्रक्रियेद्वारे अध्यक्ष होण्याचा पहिला मान डॉ. ढेरे यांना मिळाला. त्यांचे “निरंजन’, “प्रारंभ’ हे मराठीतील तर “बंद अधरो से’ हा हिंदी कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. “काळोख आणि पाणी’,”मनातलं आभाळ’ आदी कथासंग्रह आहेत. त्यांच्या “स्त्री लिखित मराठी कविता’ पुस्तकाला 2017 चा “मसाप’चा पुरस्कार मिळाला होता. गोवा येथे 2012 मध्ये झालेल्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

नाट्य संमेलनाक्षपदी प्रेमानंद गज्वी
99 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली. “किरवंत’, “गांधी आणि आंबेडकर’ ही गज्वी यांची प्रसिद्ध नाटके आहेत. त्यांनी नाटकांद्वारे समाजातील दुर्लक्षित विस्थापितांची बाजू मांडली. “गांधी-आंबेडकर’ नाटकातून त्यांनी दोन महापुरुषांचा संघर्ष रेखाटला आहे. “हवे पंख नवे’ हा आंबेडकरांवर त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे 14 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांचा वि.वा. शिरवाडकर पुरस्कार, “मसाप’च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे.

पुलोत्सवाला भरभरून प्रतिसाद
पुलोत्सवाचे यंदाचे 15 वे वर्ष होते. हे वर्ष पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे असल्याने यंदाचा पुलोत्सव दि. 18 ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडला. पुलोत्सवांतर्गत पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्कार, डॉ. विकास आमटे यांना “कृतज्ञता सन्मान’, डॉ. जयंत नारळीकर यांना “विशेष सन्मान’, शि. द. फडणीस यांना “विशेष सन्मान’, कौशिकी चक्रवर्ती यांना “तरुणाई सन्मान’ आणि उ. झाकिर हुसेन यांना यांना पु.ल. स्मृती सन्मान प्रदान आले. यामध्ये पुलंचे पैलू उलगडणाऱ्या विविध परिसंवादाचे आयोजन केले होते. पुलंशी संबंधित असणाऱ्या संगीत, नाट्य, चित्रपट आणि साहित्यातील निवडक शैलीचे यावेळी सादरीकरण झाले. दिग्गज मान्यवरांचा यामध्ये सहभाग होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)