सांडपाणी शुद्ध करायचे, तर जागा द्या

महापालिकेचे कॅन्टोन्मेंट बोर्डला ‘पत्रोत्तर’

पुणे- पर्वती जलकेंद्र ते लष्कर जलकेंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनीचे काम कॅन्टोन्मेंट बोर्डाने थांबविले आहे. ते करायचे असल्यास बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारे सांडपाणी पालिकेने शुद्ध करून देण्याची मागणी बोर्डाने केली आहे. मात्र, त्यासाठी बोर्डाने 1 हेक्‍टर जागा द्यावी, तसेच त्या खर्चाबाबत चर्चा करावी असे पत्र, महापालिकेने बोर्डाला दोन दिवसांपूर्वी दिले आहे.

का थांबले जलवाहिनीचे काम?
लष्कर जलकेंद्राला ज्या परिसरात जलवाहिनी जोडली जाणार आहे, तेथील जमिनीखाली कठीण खडक लागला आहे. तो फोडण्यासाठी वेळ जात असल्याने महापालिकेने नियंत्रित भूसुरूंग स्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यक परवानगी महापालिकेने मिळविल्या. हे स्फोट करायचे असल्यास हा संपूर्ण रस्ताच बंद ठेवावा लागेल. त्यामुळे पालिकेने बोर्डाकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र, बोर्डाने नियंत्रित सुरूंग स्फोट करण्यास मान्यता देतानाच, बोर्डाच्या हद्दीतीला सांडपाणी महापालिकेने शुध्द करून द्यावे, अशी भूमिका घेतल्याने हे काम बंद पडले आहे.

काय आहे महापालिकेचे पत्र?
महापालिकेने बोर्डला पाठविलेल्या पत्रात, सध्या बोर्डाच्या हद्दीतील भैरोबानाला सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात शुद्ध करता येणार नसल्याचे कळविले आहे. या केंद्राची क्षमता 130 एमएलडी असून त्यात सध्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी येत असल्याने त्यावर प्रक्रिया करता येत नाही. तसेच या प्रकल्पाविरोधात “एनजीटी’मध्ये दावा दाखल असून “एनजीटी’ने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे आणखी सांडपाणी शुद्ध करता येणार नाही. तर, पाणी शुद्ध करून हवे असल्यास नवीन प्रकल्पासाठी सेंट मेरीज चर्चच्या मागील बाजूस अथवा त्या परिसरात एक हेक्‍टर जागा उपलब्ध करून द्यावी, खर्चाबाबत करारनामा करावा, त्यानुसार स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात यावा, असे नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)