सांडपाणी योजनेला “निकृष्ठ कामा’ची दुर्गंधी

राजेगावातील स्थिती; काम अर्धवट असल्याने नागरिकांत नाराजी
राजेगाव, – राजेगाव (ता.दौंड) हे गाव पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दत्तक घेतले आहे. यासाठी गावात विविध विकासकामे करण्यासाठी वेळेवेळी बैठका घेतल्या गेल्या. गावातील मुलभुत प्रश्‍न, समस्या कोणत्या? याविषयी वेळोवेळी चर्चा करून शासकीय निधी उपलब्ध करण्यात आला. गावालाही तालुक्‍यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही मुलभूत बाबींसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
आमदार राहुल कुल यांच्या निधीतून गावातातील भूमिगत गटार योजनेसाठी अंदाजे 35 लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाची निविदा निघाल्यानंतर गावातील काही नेते मंडळींची बैठक घेऊन या कामाला सुरूवात करण्यात आली, गावातील काही भागात हे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या योजनेसाठी मुख्यलाईन ज्या ठिकाणावरून टाकायची आहे, ते ठिकाण भिगवण-दौंड मुख्य रस्त्यावर आहे. या रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण झाल्याने येथे काम करणे अवघड ठरत आहे. परंतु. अतिक्रमणाची अडचण न साडविताच याकामाकरिता रस्त्याच्या बाजूला चर (खड्डा) खोदण्यात आला असून गेली अनेक दिवस तसाच असल्याने प्रवासी आणि नागरिकांना याचा त्रास होत आहे. ज्या ठिकाणी सांडपाण्याचे पाईप टाकण्यात आले, त्या ठिकाणीही अर्धवट काम करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही भागात सांडपाणी योजना पूर्ण झाली आहे. त्या भागातील नागरिकांनी सांडपाणी त्यामध्ये सोडले आहे. परंतु, काही काम अपूर्ण असल्याने सांडपाणी बाहेर येऊन साचू लागले आहे, त्यामुळे दुर्गंधीही वाढली आहे. तसेच याकामारिता वापरण्यात आलेले पाईप निकृष्ठ दर्जाचे असून खोदाई कमी असल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शासकीय अधिकाऱ्याचेही या कामावर नियंत्रण नाही. या झालेल्या कामाची चौकशी करून सांडपाणी योजना लवकरात लवकर पुर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

राजेगावीतील भूमिगत गटार योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हे काम दर्जेदार होत नसेल तर संबंधीताना निश्‍चितच जाब विचारला जाईल. शासकीय अधिकाऱ्यांनाही काम दर्जेदार करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. नागरिकांनीही कामावर लक्ष ठेवावे, याबाबत अडचणी असल्यास संपर्क साधावा.
– राहुल कुल, आमदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)