सांडपाणी पुर्नवापराचा “मास्टर प्लॅन’

पिंपरी – महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी उद्योगांना नाममात्र दराने देण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनानेही त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे महापालिकेने सांडपाणी पुर्नवापराचा मास्टर प्लॅन तयार केला असून 80 दशलक्ष लिटर सांडपाण्याचा एमआयडीसीमध्ये फेरवापर शक्‍य होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रतिदिन 312 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एका प्रभागात 2016 साली सांडपाण्यावर प्रक्रीया करून पुनर्वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविला आहे. भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शाश्वत जलस्त्रोतनिर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन आणि नियोजनपूर्ण वापर करण्यासंदर्भात आता राज्य सरकारने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुनर्चक्रिकरण व पुनर्वापरासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यासाठी आयआयटी किंवा नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्युट (निरी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रक्रीयायुक्त पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे.

त्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र, एमआयडीसी, रेल्वे किंवा अन्य मोठ्या प्रमाणावरील खरेदीदार यांना प्रक्रीयायुक्त पाणी पुरविण्यात येणार आहे. प्रक्रियायुक्त पाणी नवीन बांधकामे, सर्व्हिस सेंटर, लॉंड्री दुकाने, कुलिंग टॉवर, हौसिंग सोसायट्या, उद्याने, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे आदी ठिकाणीही वापरण्यात येणार आहे.

महापालिका हद्दीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या 30 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत पाणी वापर हा सांडपाण्यावर प्रक्रीया केलेल्या पाण्याने पुर्नचक्रीकरण आणि पुर्नवापर माध्यमातून करण्यात येणार आहे. शहरातील औद्योगिक भाग तसेच हिंजवडी, चाकण, तळवडे येथील एमआयडीसीच्या भागात प्राधान्याने हा पाणी पुरवठा करून बचत होणारे पाणी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्यात येणार आहे. प्रक्रीयायुक्त पाण्याच्या वितरणाकरिता संपूर्णपणे नवीन जाळे आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य नसल्याने 607 किलोमीटरचे प्राथमिक जाळे उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे-सौदागर, वाकड, हिंजवडी – एमआयडीसी या भागाकरिता कासारवाडी येथे प्रतिदिन 75 दशलक्ष लिटर केंद्राची उभारणी करणे, पपिंग केंद्र उभारणे आणि चिखली येथे प्रतिदिन पाच दशलक्ष लिटर प्रक्रीया केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे चारशे कोटींचा खर्च होणार आहे. उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी टर्शरी ट्रीटमेंटचा वापर करण्यात येणार आहे. एमआयडीसी व एमसीसीआयएशी चर्चा करुन महापालिका दर निश्‍चित करणार आहे.

22 एमएलडी सांडपाण्याचा पुर्नवापर
महापालिकेकडून सध्या 25 एमएलडी सांडपाण्याचा पुर्नवापर केला जात आहे. मागील सहा वर्षापासून मैलाशुध्दीकरण प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी उद्यानांना वापरण्यास सुरुवात झाली आहे. रस्ता सुशोभिकरणासाठी महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा तसेच मध्यभागी लावलेल्या झाडांना, लॉन्सलाही हे पाणी पुरवले जाते. याखेरीज प्रक्रिया केलेले पाच दशलक्ष लिटर पाणी पिंपरीतील लष्कराच्या डेअरी फार्मसाठी, दहा दशलक्ष लिटर पाणी दापोडीतील सीएमईच्या आंतरराष्ट्रीय रोइंग चॅनलसाठी दिले जाते. वायसीएम रुग्णालयातील दररोजच्या 0.65 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुर्नवापर केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेने संभाजीनगर, प्रभाग क्रमांक 9 या पूर्वीच्या “मॉडेल वॉर्ड’मध्ये असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांकरिता पाण्याच्या पुर्नवापराची योजना हाती घेतली आहे.

चऱ्होली “एसटीपी’चे पाणी बांधकामांना
चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रीया केलेले पाणी या भागात नव्याने विकसित होत असलेल्या बांधकाम व्यवसायासाठी आणि सोसायट्यांसाठी पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी देण्यात येणार आहे. प्रक्रीयायुक्त पाणी पुरवठा करण्यासाठी लाल रंगाची वाहिनी असणार आहे. पिण्याच्या पाण्याची वाहिनी आणि प्रक्रीयायुक्त पाण्याची वाहिनी चुकीने एकत्र होऊ नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे.

प्रक्रियायुक्त एकूण सांडपाण्याच्या 20 टक्के पाण्याचा पुर्नवापर करणे महापालिकेला बंधनकारक आहे. उर्वरीत पाणी प्रक्रिया करुन नदीपात्रात सोडावे लागते. सध्या महापालिका 5 टक्‍क्‍यांहून अधिक पाण्याचा पुर्नवापर करते. उद्योगांना प्रक्रियायुक्‍त सांडपाणी नाममात्र दराने देण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा पुर्नवापर वाढेल.
– संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)