सांगवी जिल्हा परिषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट 

मुख्याध्यापिका मीना बोडके यांचे मार्गदर्शन : वृक्षसंवर्धनासाठी “एक मूल एक झाड’ उपक्रम
ओंकार दळवी
जामखेड – तालुक्‍यातील सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकसहभागातून अक्षरश: कायापालट झाला आहे. मुख्याध्यापिका मीना बोडके यांनी लोकसहभाग वाढवून शाळेत विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. शाळेतील या उपक्रमांचा दृश्‍य परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेची चांगलीच गोडी लागली आहे. त्यामुळे शाळेबाबत पालकवर्गामध्येही समाधानाचे वातावरण आहे.
तालुक्‍यातील रत्नापूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सांगवी या 500 लोकवस्ती असलेल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. विंचरणा व पाटोदा नदीच्या संगमावरील हे गाव आहे. यामध्ये 25 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही शाळा तशी अडगळीत पडल्यासारखी होती. शाळेच्या 3 खोल्या जीर्ण अवस्थेत आहेत. गावचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. येथे विद्यार्थ्यांसह शिक्षक, ग्रामस्थांनही अनेक उणीवांचा सामना करावा लागत होता.
अखेर मुख्याध्यापिका मीना बोडके यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शाळेचा कायापालट करायचा चंग बांधला. यासाठी त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, सभापती सुभाष आव्हाड, पंचायत समिती सदस्य राजश्री मोरे, रत्नापूरचे सरपंच दादासाहेब वारे, उपसरपंच शाहाजी महानवर, अध्यक्ष अशोक महानवर, किसान महानवर, देविदास साळवे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, केंद्र प्रमुख निळकंठ घायतडक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजू महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला दोन खोल्याही मंजूर करून घेतल्या. शाळेने आता आयएसओ मानांकनाकडे वाटचाल सुरू केली आहे.
शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे 25 विद्यार्थी इ-लर्निंग डिजीटल क्‍लासरूमच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. या शाळेत विविध उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शाळेची शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. शाळेत सकाळी नऊ वाजता डिजीटल परिपाठ घेतला जातो. मुख्याध्यापक, शिक्षक हे विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य समजतात. ग्रामस्थांतही आपुलकी निर्माण झाली. विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि स्नेहसंमेलन यातूनही गावकऱ्यांनी भरीव आर्थिक मदत केल्याने शाळा नावारूपाला आली. त्याचबरोबर “एक मूल एक झाड’ ही योजना राबविली. शाळेत सिंचनासाठी ठिबकची सोय केलेली आहे. प्रत्येक दिन विशेष, उपक्रम शाळेने राबविले जात होते. शाळेत झालेला सकारात्मक बदल ग्रामस्थांच्या लक्षात आला आणि शाळेसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे याची जाणीव झाली.
गटशिक्षणाधिकारी काळे यांचेही शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मिळत होते. वरिष्ठ पातळीवर शाळेला सहकार्य मिळवायचे तर शाळेच्या समस्या तिथपर्यंत पोहचविणे आवश्‍यक होते. मग काय सर्वांनी एकत्र येण्याचा पर्याय म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. त्याचेही आयोजन करायचे ठरवले. पंचायत समितीचे उपसभापती राजश्री मोरे व भाजप जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळेच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी जमा बक्षीस रकमेतून शाळेसाठी संगणक संच उपलब्ध करण्यात आला. देणगीदारांच्या सहकार्याने शाळेत स्वतंत्र कम्प्युटर कक्ष आणि ई लर्निंगची सुविधा केल्याचे मुख्याध्यापिका मीना बोडक, शिक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंगद्वारे अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांची शिक्षणाची गोडी वाढण्यास ही शैक्षणिक पद्धत उपयुक्त ठरली आहे. शाळेचा परिपाठही वैशिष्ट्यपूर्ण असतो. रोज वेगळी प्रार्थना, समूहगीताचा समावेश असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)