3 पोलीसगाड्या फोडल्या; 6 पोलीस जखमी
सांगली – सातारा येथील मोक्का गुन्ह्यातील आरोपी दत्ता जाधव याला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील प्रतापपूर येथे पकडायला गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. सातारा आणि सांगली पोलीस व ग्रामस्थ यांच्यात जोरदार वाद झाला.यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. गावातील उरसात तमाशा सुरु असताना तेथे पोलिसांनी छापा टाकल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. जाधव टोळीतील गुंडासह महिलांनी दगडफेक केली, महिला पोलिसांना गळा आवळून मारण्याचा प्रयत्न झाला.
यामुळं गावातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या सर्व गोंधळाचा फायदा घेऊन जाधव पळाला. मात्र, त्याच्या भावासह सहा जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलिसांनी जत पोलिसांच्या सहकार्याने ही मोहिम राबवली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळलेली माहिती अशी की, सातारा येथील प्रतापसिंहनगर परिसरात झोपडपट्टीदादांच्या टोळीने सातारा जिल्ह्यात दहशत माजविली आहे. या टोळीवर पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्या दत्तात्रय रामचंद्र जाधव आणि त्याच्या साथीदारावर मोका लावण्यात आला असून, जाधव गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. तो साथीदारासह प्रतापपूर येथे पीरबाबाच्या उरसाला येणार असल्याची खबर सातारा पोलिसांना मिळाली होती. प्रशिक्षणार्थी अधीक्षक पवन बनसोडे व त्यांच्या पथकातील कर्मचारी त्याला अटक करण्यासाठी आले असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा