सांगड समाज आणि अर्थकारणाची

व्यवसाय आणि समाजकार्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थार्जन करूनच समाजासाठी कार्य केले जाऊ शकते आणि केवळ पैसे करून आणि व्यवसायात यशोशिखरे गाठून सामाजिक आवश्‍यकता पूर्ण होत शकत नाहीत. यासाठी व्यवसायासोबत सामाजिक कार्यदेखील केलेच पाहिजे आणि गरजू व वंचितांना मदत करण्यासाठी केवळ समाजकार्य करून चालणार नाही तर उद्योग-व्यवसाय करून अर्थार्जन आणि रोजगारांच्या संधीदेखील निर्माण केल्या पाहिजेत, हे विचार आहेत शहरातील प्रख्यात युवा व्यावसायिक आणि समाजसेवक सचिन नावंदर यांचे.

गेल्या दोन दशकांपासून व्यवसाय आणि समाजकार्य यांचा समतोल साधणाऱ्या सचिन नावंदर यांनी दै. “प्रभात’सोबत केलेल्या चर्चेचे काही मुख्य अंश. सचिन नावंदर यांना त्यांचे वडील अशोककुमार नावंदर यांच्याकडून सामाजिक कार्याचा वारसा लाभला. गेल्या 35 वर्षांपासून निगडी प्राधिकरण येथे स्थायिक असलेले नावंदर कुटुंब हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. गेल्या 24 वर्षांपासून ते नावंदर कुटुंब रक्‍तदान शिबिराच्या आयोजनात मोठे सहकार्य करत आले आहे. सचिन नावंदर हे हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. वडिलांच्या स्मरणार्थ ते दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रक्‍तदान शिबिराचे आयोजन करतात. आजवर सुमारे दहा हजारांहून अधिक युनिट रक्‍ताचे त्यांनी संकलन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच स्वर्गरथ ही संकल्पना पिंपरी-चिंचवड शहरात राबवण्यात देखील सचिन नावंदर यांचे मोठे योगदान आहे. कोणत्याही समाजाच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यास मृतदेह आणण्यासाठी त्यांनी स्वर्गरथ ही मोफत सेवा शहरात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या तीन वर्षांपासून स्वर्गरथाच्या संचालनाची जबाबदारी ती सांभाळत आहे.

वारकऱ्यांच्या सेवेत ते नेहमीच हजर असतात. शहरात वारकऱ्यांचे ठिक-ठिकाणी सेवा आणि आदरातिथ्य केले जाते; परंतु शहरापासून शंभर किलोमीटर दूर गेल्यावर मात्र वारकऱ्यांना भोजन मिळणे अवघड जाते. अतिशय दुर्गम अशा परिसरात जाऊन नावंदर आणि त्यांचे सहकारी वारकऱ्यांसाठी भोजनसेवेचे आयोजन करतात. दरवर्षी शहरापासून सुमारे 150 किलोमीटर दूर असलेल्या माळशिरस येथे जाऊन वारकऱ्यांना गरम भोजन वाढले जाते.
नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी दरवर्षी नवरात्रीमध्ये नावंदर निगडी प्राधिकरण येथे आठ वर्षांपासून “ढोल बाजेरे’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असतात. सचिन नावंदर सांगतात की, या सर्व कार्यांसाठी त्यांचे बंधू मनीष नावंदर, सहकारी आदित्य नहार, सुशील सारडा, भूषण मानुधणे यांचे सहकार्य नेहमी लाभते. यांच्या सहकार्याशिवाय ही कार्ये होऊ शकत नाहीत.

कित्येक बड्या सामाजिक आणि राजकीय संघटनांमध्ये सचिन नावंदर महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यात प्रामुख्याने महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष, महेश सेवा संघ पुणेचे उपाध्यक्ष, संत तुकाराम प्रतिष्ठान प्राधिकरणचे विश्‍वस्त, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष, भाजपा व्यापारी आघाडी पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत.
समाजकार्य, व्यवसाय व दैनंदिन जीवन व्यवस्थित चालावे, यासाठी निरोगी राहणे खूप गरजेचे आहे, असे ते म्हणतात. यासाठी त्यांनी “फ्रेंड्‌स क्‍लब ऑफ प्राधिकरण’ची स्थापना केली. गेली 13 वर्षे या क्‍लबच्या माध्यमातून सर्व वयोगटातील लोक रोज फुटबॉल खेळत आहेत.

व्यवसायात अग्रसेर
सचिन नावंदर हे व्यवसायात देखील अग्रणी आहेत. वयाच्या विसाव्या वर्षांपासून त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. ते शहरातील एका पेट्रोल पंपाचे संचालक असून त्याव्यतिरिक्‍त विकसनचा व्यवसायदेखील सांभाळत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पहिला ऑनलाइन सीएनजी पंप सुरू करण्याचा मानदेखील त्यांच्या चिकाटीने मिळवला आहे. 17 जानेवारी 2011 रोजी त्यांनी चिंचवड येथे त्यांनी इंडियन ऑईलचा पहिला ऑनलाइन सीएनजी पंप सुरू केला. तरुणांनी उद्योग-व्यवसायात उतरावे, यासाठीदेखील ते प्रयत्न करत असतात. युवकांना मार्गदर्शन करताना सचिन नावंदर सांगतात की, स्वप्न पाहावे, स्वप्ने पाहिल्याशिवाय ती सत्यात उतरणे शक्‍य नाही. यशाचे गमक सांगताना ते म्हणतात की, कोणाचीही फसवणूक करू नका, आपले प्रामाणिकपणे आणि जिद्दीने काम करत राहा, यश नक्‍कीच मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)