सह्याद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’

पश्चिम घाटातले ‘कास पठार’ युनेस्कोच्या २०१२ साली जागतिक वारसास्थळात नोंद झालेले ठिकाण. साताऱ्याजवळ असलेले हे ठिकाण म्हणजे सह्याद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’. कास पठार समुद्र सपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. साधारण पावसाळ्यात ऑगस्टच्या शेवटापासून ते सप्टेंबरमध्ये येथे विविधरंगी फुले फुलतात.

कास पठार सातारा शहराच्या पश्चिमेस अंदाजे २५ किमीवर आहे. साताऱ्याहून एस.टी. किंवा जीपने सुद्धा इथवर पोहोचता येते. कासकडे जाताना एक घाट पार करावा लागतो. घाटातून जाताना अजिंक्यतारा किल्ला आपल्याला दर्शन देत राहतो. उजवीकडे कण्हेर व डावीकडे उरमोडी धरण लागते. रस्त्याच्या दुतर्फा उमललेली पिवळी सोनकीची फुले आणि आजुबाजूची हिरवाई म्हणजे निव्वळ अप्रतिम. कधी काळ्या ढगांची गर्दी तर कधी लख्ख सोनेरी पिवळे ऊन असा निसर्गाचा सुंदर देखावा इथे पहायला मिळतो.

पठारावर पोहचता क्षणीच स्वागताला असतात रंगीबेरंगी गालिचे. हे पठार आता कुंपणाने संरक्षित केले आहे व ठराविक ठिकाणीच पर्यटकांना फुले जवळून बघता येतात. येथील वातावरणाचा अंदाज लावता येत नाही, क्षणार्धात पठारावर ढग उतरून पाऊस सुरु होतो.

जांभळी मंजिरी, कवळा, सीतेची आसवे, गेंद, निसूर्डी, तेरडा अशी अगणित रानफुलांची नक्षी सहज नजरेस पडते. जवळपास २८० फुलांच्या प्रजाती येथे आढळल्या आहेत. येथील काही प्रदेशनिष्ठ व अतिदुर्मिळ वनस्पती असून त्यांची ‘आय.यु.सी.एन.’ च्या रेड डेटा मध्ये नोंद झाली आहे. जैवविविधतेने समृद्ध या पठारावर फुलांसोबत विविध पक्षी, फुलपाखरे, झाडे-वेली, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी देखील आढळतात.

असे हे कासचे पुष्पसौंदर्य मनात भरभरून साठवावे. साऱ्या जगाने दखल घेतलेल्या या झ’कास’ पठाराला नक्की भेट द्या. बरोबर फुलांची माहिती सांगणारा जाणकार किंवा फिल्ड गाईड असेल तर उत्तमच. या पठाराचे संवर्धन करण्यासाठी शासनाने चांगली पावले उचलली आहेत. हल्ली येथे मर्यादित पर्यटक सोडले जातात आणि त्यांच्याकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. चांगले फोटो मिळवण्याच्या धडपडीत वनस्पती व फुलांची नासधूस करू नका. तिथली फुले तोडू नका आणि निसर्गाचा ऱ्हास होईल असे गैरवर्तन टाळा. येथून जवळच कास तलाव, वजराई धबधबा, यवतेश्वर मंदिर, सज्जनगड, ठोसेघर धबधबा ही स्थळे आहेत त्यांनाही तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

– सुप्रसाद पुराणिक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)