सह्याद्रिच्या कार्यस्थळावर 1 जुलै रोजी वृक्षारोपण

मसूर, दि. 27 (प्रतिनिधी) : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 1 जुलै या जन्मदिनाचे औचित्य साधून शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत कारखान्यानजीकच्या महादेव डोंगर उतारावर सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते व उपवनसंरक्षक ए. एम. अंजनकर तसेच कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन सौ. लक्ष्मीताई गायकवाड आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत 1 जुलै रोजी दुपारी 4 वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर यांनी दिली.
बडगुजर म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या धोरणानुसार प्रती वर्षी कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात येते. त्या धोरणानुसार कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना मालकीच्या 20 एकर क्षेत्रावर अनेक प्रकारची झाडे लावून ती उत्तमप्रकारे जोपासल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार देवून कारखान्याचा गौरव केलेला आहे. तद्‌नंतर वृक्षारोपणासाठी राज्यशासनाकडून कारखान्यास मिळालेल्या महादेव डोंगर उतारावरील 44 हेक्‍टर क्षेत्रापैकी गतवर्षी 5 हेक्‍टर क्षेत्रावर 2500 रोपांसह आजवर एकूण 20 हेक्‍टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात येवून त्यांची उत्तम प्रकारे जोपासना होण्यासाठी त्याठिकाणी वनतळे बांधून ठिबक सिंचन संचाने पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान, दि. 1 जुलै रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता कारखान्याच्या मेन गेटवर आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यंदाही 1 जुलै रोजी आणखी 3000 रोपांची लागण करण्यात येणार असून सदरच्या वृक्षारोपण समारंभास सभासद, शेतकरी, कर्मचारी यांनी अगत्य उपस्थित रहावे, असे आवाहन बडगुजर यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)