सहा शाळा होणार “स्मार्ट’

पिंपरी – केंद्र सरकारच्या “स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील सहा शाळांमध्ये “स्मार्ट शाळा’ हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये निवड केलेल्या महापालिकेच्या शाळांना अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, “स्मार्ट शिक्षण’ हा “स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा एक भाग आहे. “एरिया बेस डेव्हलपमेंट’अंतर्गंत या सहा शाळा “स्मार्ट’ व संपुर्ण इंग्लिश माध्यमाच्या करण्यात येणार आहे. नगर विकास विभागाचे प्रधान नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यात पिंपळे गुरव शाळा क्रमांक 54, पिंपळे सौदागर शाळा क्रमांक 51, म्हेत्रे वस्ती शाळा, सांगवी पी. ए. होळकर या चार प्राथमिक शाळा तर पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या दोन माध्यमिक शाळा निवडण्यात आल्या आहेत.

या शाळा पूर्णपणे इंग्लिश माध्यमाच्या केल्या जातील. तसेच, “ई-क्‍लास रुम’, “ई-लर्निंग’, “डिजिटल लॅब’, “सायन्स लॅब’, “इंग्लिश लॅब’, “रोबोटिक्‍स लॅब’ हे उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी चार कोटींची तरतूद होती ती 40 कोटी करण्यात आली आहे. यामध्ये शाळांना “ई लर्निंग किटी’, “इंग्लिश स्पोकन’चे अद्यावत वर्ग, “म्युनिसीपल क्‍लास रुम’, “डिजीटल कम्प्यूटर लॅब’, “स्मार्ट क्‍लास रुम’ असे अनेक उपक्रम यामध्ये राबवले जाणार आहेत. निवड झालेल्या सहा शाळांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील इतर शाळांमध्ये देखील हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे आयुक्‍त हर्डीकर यांनी सांगितले.

आमदार जगतापांना झुकते माप
“स्मार्ट सिटी’च्या इतर प्रकल्पांप्रमाणे “स्मार्ट शाळां’चा प्रयोग देखील आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर याच भागात राबवला जाणार आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी हा भाग “एरिया बेस डेव्हलपमेंट’चा असल्याने येथील शाळांची निवड केल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, चिखलीतील शाळा सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या प्रभागातील आहे. “एरिया बेस डेव्हलपमेंट’च्या परिघा बाहेरील शाळा निवडून या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. “स्मार्ट सिटी’साठी पिंपळे सौदागर या भागाची निवड करण्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच शाळा निवडतानाही शहरातील इतर भागांचा विचार स्मार्ट सिटी कंपनीने केलेला नाही. त्यामुळे आणखी एका राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)