सहा शाळांच्या 156 विद्यार्थ्यांचे स्वीकारले पालकत्व

थेरगाव सम्राट मित्र मंडळ : पाच हजार कागदी पिशव्यांचे वाटप

पिंपरी  – थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून सहा शाळांचे 156 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. शाळांना संगणक व शालेय साहित्य भेट देऊन शाळेला हातभार लावण्याचा अभिनव उपक्रम या मंडळाने केला आहे. तसेच पाच हजार कागदी पिशव्यांचे वाटप करून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून मंडळ प्रबोधनाचे काम समाजात करत आहे.

थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळाला यावर्षी गणेशोत्सव स्थापनेस 39 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षी मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. दत्तक घेतलेल्या सहा शाळांना दोन संगणक तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये रायगड कर्जत येथील जांभूळवाडी, तसेच घोडेवलवाडी, धुळे शाळा क्रमांक चार, जिल्हा परिषद कापडनी, तसेच सोलापूरमधील दोन जिल्हा परिषदांच्या शाळांचा समावेश आहे.

या मंडळाने आजपर्यंत जिंवत देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत केला आहे. या देखाव्यामध्ये भक्तीरथाच्या माध्यमातून विठ्ठल दर्शनाचा देखावा सादर करण्यात आला आहे. तसेच सर्वांत मुख्य म्हणजे या मंडळाने प्लॅस्टिक कचरा विघटन होत नाही यासाठी पाच हजार कापडी पिशव्या गणेश भक्तांना वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गौरी सजावट स्पर्धा मंडळाच्या माध्यमातून घेतल्या जातात. यामध्ये महिलांनी गौरी सजावटीचा दोन मिनिटांचा व्हिडीओ तयार करून व्हॉटसऍपला पाठवायचा आहे. यासाठी विविध पारितोषिके महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच थेरगावमधील विविध परिसरात विशेष नैपुण्य मिळविलेल्या कलाकारांना व गुणवतांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

थेरगावमधील हे एकमेव पथक आहे की, यामध्ये पाच ढोल ताश पथकांचा समावेश आहे. सर्वांत मोठे गणेश मंडळ हे या परिसरातील आहे. यामध्ये नादब्रम्ह, लक्ष्मीबाई बारणे, युवा, ऐतिहासिक व वारकरी पथकांचा समावेश आहे. दरवर्षी विविध उपक्रम राबविण्याचा मंडळाचा अट्टाहास असतो, असे गणेश मंडळाचे अध्यक्ष निलेश बारणे, कार्याध्यक्ष निलेश पिंगळे, उपाध्यक्ष विक्रम शेळके यांनी सांगितले.

मागील वर्षी मंडळाने अंनत चतुर्थीला पवना घाटावर जाऊन अस्ताव्यस्त मूर्ती संकलित केल्या होत्या. यावर्षी देखील संकल्प आमचा, बहिष्कार चिंनी वस्तूचा असा उपक्रम राबविला आहे, यामध्ये भाविकांसाठी विविध घोषणा मंडळाने ठिकठिकाणी लावलेल्या आहेत. यामध्ये वापर स्वदेशीचा बहिष्कार चिंनी वस्तूचा, नको युद्ध रक्तपाताचे करू रक्षण भारतमातेचे, चायनाला शिकवायचा आहे धडा विकत घेऊ नका मेड इन चायना, गर्व बाळगा भारतीय असल्याचा वापर करा फक्त स्वदेशी मालाचा अशी जनजागृती करण्यात आली होती. तसेच मंडळाने पथनाटयाच्या माध्यमातून देखील प्रबोधन केले आहे. देशभक्ती जागवा स्वदेशी वापरा असा नारा पथनाट्याने यावर्षी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)