सहावीच्या मराठी माध्यमाच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषा

सुनिल तटकरे यांचा आत्महत्येचा इशारा


विधानपरिषद सोमवारपर्यंत स्थगित


सरकारला खुलासा करण्याचे सभापतींचे निर्देश

नागपूर – राज्यातील मराठी माध्यमाच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पाने जोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती आज विधानपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी उघडकीस आणली. ही बाब खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास मी विष घेऊन सभागृहात आत्महत्या करेन, असा इशारा देताच सभागृहाचे वातावरण बदलून गेले.

सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर उडालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. अखेर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आत्महत्या करण्याची भाषा आपण करू नये, अशा शब्दांत तटकरे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सभागृहाचे वातावरण अधिक खराब होण्याआधी त्यांनी सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केले.

विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्दयाद्वारे आमदार सुनिल तटकरे यांनी इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे पहिल्यावेळी कामकाज तहकुब झाले. मात्र त्यानंतर सभागृह सुरु झाल्यानंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी असे पुस्तकच नाही, असा दावा केल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे पुन्हा 15 मिनिटासाठी सभागृह तहकुब झाले.
त्यानंतर सभागृह सुरु झाल्यावर चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे सहावीचे भूगोल पुस्तक आहे. परंतु त्या पुस्तकात एकही गुजराती पान नाही आणि हे पुस्तक जुनमध्ये छापण्यात आले आहे. त्यामुळे तटकरे यांना जर असे काही सापडले असेल तर त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच का सादर केले नाही, असा मुद्दा उपस्थित करुन आणखी वाद निर्माण करुन दिला. त्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ सुरु झाला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत या पुस्तकाबाबत सभागृह नेत्यांनी शंका निर्माण केली आहे. या पुस्तकाच्या एक लाख प्रती गुजरातमधील श्‍लोक प्रिंट अहमदाबाद कंपनीकडून छापून घेतल्या असल्याचे सांगितले. हा आमच्या महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न असून भूगोल पुस्तकामध्ये 15 गुजराती पाने आली कशी असा सवाल केला.

गुजरातच्याबाबतीत लाचार व्हा, परंतु महाराष्ट्रातील माणूस कधीही गुजरातपुढे लाचार होणार नाही असा इशारा मुंडे यांनी सरकारला दिला. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी व जाहीर खुलासा करावा, अशी मागणी केली. चूक कुठून झाली, याबाबत चौकशी करायला पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधकांची मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जे घडले आहे ते विद्यार्थ्यांच्यादृष्टीने घातक आहे. दादा हा अस्मितेचा महत्वाचा मुद्दा जितका महत्वाचा आहे तितकाच तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे मी सोमवारपर्यंत राज्य सरकारने यावर सखोल खुलासा करावा, असे निर्देश दिले. मात्र त्यानंतर आमदार सुनिल तटकरे यांनी सभागृह नेत्यांनी हे पुस्तक बाहेरुन छापून आणले असावे, अशी शंका व्यक्त केली.

मी माझ्या 30-35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असे घाणरडे राजकारण केले नाही. मी एकवेळ या सभागृहात विष घेवून आत्महत्या करेन, परंतु असे काम कधी करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर सभागृहात सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर सभागृहात घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे शेवटी सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)