सहवासाची ओढ

ही गोष्ट परदेशातली आहे, सत्यकथा आहे. एका वृद्धाने एकटेपणाला कंटाळून आपलं जीवन संपवण्यापूर्वी स्वतःची सारी संपत्ती आपल्या कुत्र्याच्या नावावर करून टाकली. ही बातमी वाचताना चेहऱ्यावर हसू उमटले, त्या व्यक्तीच्या तऱ्हेवाईकपण्याची की वही आली, पुढे वाचताना मात्र त्यामागील कठोर दाहकता मनाला भिडली.

त्या वृद्धाचे म्हणणे होते की, तीन अपत्ये-सुना आणि पाच नातवंडं असा भरगच्च परिवार असूनही जीवनाच्या संध्यासमयी माझ्या जवळ कोणीच नव्हते. एकटा होतो मी आणि माझे एकटेपण त्यांनीच माझ्यावर लादले होते. त्यांना वेळच नव्हता. माझ्याबरोबर राहणे तर दूरच; पण मला भेटायला, माझ्याशी बोलायलाही वेळ नसे. तासन्‌तास, दिवसच्या दिवस मी भुतासारखा एकटा असायचो.

हा भयाण एकटेपणा मला खायला उठे. कोणी बोलायला नाही, पण ऐकायलाही कोणी नसावं याहून मोठं दुर्देव ते काय? कोणीतरी माझं ऐकावं, कोणीतरी माझ्याजवळ असावं, ही कमतरता दूर व्हावी म्हणून शेवटी मी कुत्रा पाळला. त्यालाच सवंगडी बनवलं. त्याच्याशी बोलणे, त्याच्या बरोबर खेळणे, त्याला खाऊ घालणे यामुळे माझ्या एकटेपण्याची तीव्रता कमी होऊ लागली, माझ्यासाठी कुत्रा हा विरंगुळा ठरला, तो प्रशिक्षित असल्यामुळे त्याला शिकवली गेलेली कामं तो नेमकी करीत असे. मला त्यात आनंद वाटे, जिथं घरचेसुद्धा माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हते, तिथे या कुत्र्यामुळे माझे जगणे आणि नंतर मरणहीे सुसह्य झाल. आणि म्हणूनच मी माझे सारेकाही त्याच्या नावावर करून जात आहे. या बातमीने आणि मृत्युपत्राने आजच्या समाजव्यवस्थेवर एका प्रकारचे कोरडेच ओढले आहेत. या घटनेने अंतर्मुख होणे क्रमप्राप्त झाले. आपण माणूस म्हणून संवेदनशील असायला हवे, हेच विसरतच चाललोय का? याची चिकित्सा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

थोर साहित्यिक शांता शेळकेंनी सांगितले आहें की, एका कवीस वाटेवर रखरखत्या उन्हात एक काटकी पडलेली दिसली. तो क्षणभर थबकला. त्याने त्या काटकीला सावलीच्या ठिकाणी नेऊन ठेवले आणि तो पुढे निघाला. पण का कोण जाणे, तो थोडा घुटमळला. त्याने एक दुसरी काटकी त्या काटकीशेजारी आणून ठेवली आणि म्हणाला, काळजी करू नकोस. आता तू एकटी नाहीस. तुला सोबत आहे. सोबतीचे महत्त्व अधोरेखित करणारे याहून वेगळे काय उदाहरण असू शकते?

सुरुवातीपासून पक्ष्यांना थव्याने, पशूंना कळपाने, तर मनुष्याला समूहाने राहण्याची सवय. सहवास ही माणसाची केवळ ओढ नव्हे, तर गरज आहे. कोणी आपल्या सोबत असल्यास आपल्याला सुरक्षित वाटते. सोबतीमुळे जगण्यास बळ मिळते. पण सध्या एकटे राहणे व एकटे ठेवणे ही पद्धत समाजात रुजू लागली आहे, त्याचा पहिला आणि मोठा फटका ज्येष्ठांना, वृद्धांना बसला आहे, आपल्या आयुष्याचा एक मौल्यवान भाग आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यात खर्ची टाकणाऱ्या आईवडिलांवर उतारवयात एकटे राहण्याची पाळी आली आहे, त्यांच्यांशी बोलणे, हसणे, त्यांना वेळ देणे, यापेक्षाही करिअर जास्त मोलाचं झालं आहे. ज्या वयात भावनिक आधार हवा असतो, सोबत पाहिजे असते, त्या वयात त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची मानसिकता बळ धरू लागली आहे.

जरासे प्रेम, दोन गोड शब्द, थोडा वेळ, यथोचित सन्मान एवढीच काय त्यांची अपेक्षा. पण ती पुरी करण्यासही आपण कमी पडत असू, तर बाकी धनदौलत प्रतिष्ठेचे काय हशील ? वडीलधाऱ्या माणसांसोबत राहावे, त्यांची काळजी घ्यावी या परंपरेला तिलांजली देऊन कोणत्या आश्‍वासक जगाची निर्मिती होणार आहे? एकटेपणाची भयावहता ओलांडायला माणसांची गरज ही लागतेच. येणारं, जाणारं, दिसणारं, बोलणारं असलं की जगणं प्रफुल्लित होतं. विकासाच्या नावाखाली जगात कितीही उलथापालथ घडली, तरी माणसाला माणसाची गरज असणारच. आपल्या घरी, सभोवार अशी बरीच एकटी पडलेली मंडळी दिसून येतात, ज्यांच्याशी बोलणारंही कोणी नाही, वयापरत्वे हालचाली मंदावल्यामुळे ज्यांच्या चालण्याफिरण्यावर मर्यादा आल्या असतील. जे घरी एकटे, खिन्न जीवन जगत असतील, अशा लोकांसाठी थोडासा वेळ काढता आला, तर पाहा. त्यांच्यांशी काय बोलावे हा प्रश्‍न येऊ शकतो, पण सुरुवात तर करा. त्यांचे म्हणणे नुसते ऐकून घेतले, तरी ते सुखावतील. तुमची सहजची भेट, उगाच मारलेल्या गप्पा, येता जाता केलेली विचारपूस त्यांच्या जीवनाला उमेद देऊ शकेल. आपण याला “समयदान” ही म्हणू शकू.

आज माणसाला माणसं नकोशी झाली आहेत. ही परिभाषा खोडणे ही आपलीच जबाबदारी आहे. जगण्याच्या धावपळीतून थोडासा वेळ काढून कोणाच्या तरी आनंदासाठी त्याचे सोबती व्हा, त्याला दिलासा द्या.

– सत्येंद्र राठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)