सहगल यांच्या निमंत्रण रद्दची साहित्यिकांकडून नाराजी

पुणे – यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उद्‌घाटक म्हणून आमंत्रित केलेल्या ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण संमेलनाच्या तोंडावर आयोजकांनी रद्द केले. या प्रकाराबाबत राज्यभरातून साहित्यिकांकडून कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असा प्रकार घडणे हा राज्याच्या अस्मितेला धक्‍का लावणारे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या, याबाबत दै. “प्रभात’ने साधलेल्या संवादात साहित्यिकांनी खालील प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मराठी भाषेला आणि संस्कृतीला कोणत्याही भाषेची बंधने नाहीत. नयनतारा या मूळच्या मराठी आहेत. त्यांना उद्‌घाटक म्हणून निमंत्रण देऊन नंतर रद्द करणे हे सांस्कृतिक पाप आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाने त्यांचे निमंत्रण रद्द करणे हा सांस्कृतिक गुन्हा आहे. मनसे पक्षाने साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात दबाव टाकणे हे अन्यायकारक आहे. पण याची जाणीव राज ठाकरे यांना झाली आणि त्यांनी दिलगीरी व्यक्त केली, ही चांगली गोष्ट आहे.”
– डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष
 
“संमेलनाच्या उद्‌घाटकांचे निमंत्रण रद्द करणे हे योग्य नाही. ज्यांचा या गोष्टीला विरोध होता, त्यांना आयोजकांनी योग्य पद्धतीने समजावून सांगणे गरजेचे होते. त्यांनी अन्य घटाकांशी चर्चा करून विचार करणे आवश्‍यक होते. तसे न करता अचानकपणे आयोजकांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे.’
– डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष
 
“नयनतारा सहगल यांना आधी आमंत्रित करून नंतर निमंत्रण रद्द करणे हे क्‍लेशदायी आहे. प्रत्येक लेखकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्यांनी लिहिलेले आवडणारे, विचारमंथन करणारे, प्रसंगी विरोधी साहित्य आपण पचवायला शिकले पाहीजे. वाचक आणि रसिकांबरोबरच संयोजकांनीही साहित्यिकांना महत्त्व दिले पाहिजे. महाराष्ट्राने याविषयावर वाद घालण्यापेक्षा साहित्यसेवा करणाऱ्यांचे साहित्य वाचले पाहिजे. या वादांनी समाजमन ढवळून निघते. समाजातील मतप्रवाह या निमित्ताने पुढे येतात. मात्र, यामुळे साहित्य संमेलनामध्ये व्यत्यय येता कामा नये, त्रास होऊ नये असा संयोजकांनी विचार करून सुरक्षित भूमिका घेतली असावी, असे मला वाटते.”
– संगीता बर्वे, लेखिका
 
“महाराष्ट्र हे सहिष्णू, उदारमतवादी आणि दुसऱ्यांचा मताचा आदर राखणारे राज्य आहे. याठिकाणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असा प्रकार घडणे हे अतिशय दुर्दैवी आहे. यासंदर्भात साहित्य महामंडळ लवकरच आपली भूमिका जाहीर करेल. मात्र, डॉ. अरूणा ढेरे यांच्यासारखी लेखिका यंदा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. अशावेळी राज्यातील साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार न टाकता त्याठिकाणी येऊन आपली भूमिका जाहीर करावी, हे संमेलनाच्या अस्मितेसाठी योग्य ठरेल.’
– मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)