सहगल प्रकरणावरुन आठवलेंनीही उपटले कान

पिंपरी- साहित्यिका नयनतारा सहगल यांचे सरकारविरोधी भाषण असल्याने त्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटनाचे निमंत्रण रद्द करणे अयोग्य असल्याचे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्‍त करत मित्रपक्ष भाजपचे कान उपटले. सहगल जर सरकारविरोधी बोलणार होत्या, तर त्याला उत्तर देण्यास सरकार समर्थ होते. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे काही नक्षलवादी नाहीत. त्यांना मुंबई पोलिसांनी भाषणास बोलू दिले नाही, हा पोलीस प्रशासनाचा निर्णय चुकीचा होता, असेही ते यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरिता रामदास आठवले रविवारी (दि. 13) पिंपरीत आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देशपातळीवरील विविध विषयांवर आपली मते व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सवर्णांना दिलेले दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, या शरद पावर यांच्या वक्‍तव्याकडे लक्ष वेधले असता आठवले म्हणाले की, संसदेत कायदा पास केल्यानंतर त्याला कोर्टात आव्हान देता येते. मात्र, संसदेपेक्षा न्यायालय मोठे नसल्याने आता या कायद्यात बदल होणार नाही. तरी देखील शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे म्हणत असतील, तर ते बरोबर नाही. हे आरक्षण टिकण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत त्यांनी सांगितल्यास त्यानुसार सरकार त्यावर अंमलबजावणी करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

वंचित विकास आघाडीच्या सभांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, कॉंग्रेसविरोधात मी स्वत: रिडालोसचा प्रयोग केला होता. त्या सभांना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, मत मिळविण्याचे तंत्र माहित नसल्याने त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे होणाऱ्या मत विभागणीचा भाजपला फायदा होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी भाजपला उघडपणे पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी केले. तसेच वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठीच ही आघाडी स्थापन करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
पक्षातच राहून एकेमकांवर कुरघोड्या करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. मात्र हे सांगत असतानाच सर्व जाती धर्माच्या आघाड्या स्थापन करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष मला स्थापन करता आला नाही, अशी प्रांजळ कबुली आठवले यांनी दिली.

…ती तर शिवसेनेची राजकीय भूमिका
ठाकरे यांच्यावरील चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांच्या दलितविरोधी संवादाला काही दलित संघटनांनी विरोध केला आहे. या संवादाला आपला देखील विरोध असेल का? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, नामांतराला बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ठाकरे यांचा डॉ. बाबसाहेबांच्या नावाला विरोध नव्हता. तर मराठवाड्यातील लोकांचा विरोध असल्याने शिवसेनेने ही भूमिका घेतली होती. त्यामुळे या चित्रपटात ही वस्तुस्थिती मांडली असल्यास त्या संवादांना आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असे ते यावेळी म्हणाले.

..त्यामुळे पवारांची पंतप्रधानपदाची संधी हुकली
मनमोहनसिंग यांच्या ऍक्‍सिडंटल पंतप्रधान होते, या मताशी मी सहमत आहे. कारण ते एक चांगले व्यक्ती होते नेता म्हणून कधी काम केले नव्हते. त्यावेळी पंतप्रधान पद स्वत:कडे घ्या, असे सांगूनही सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. त्यावेळी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या शरद पवार यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. त्यामुळे पवार यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली. केवळ पाच-सहा खासदारांच्या जोरावर ते भविष्यातही पंतप्रधान होतील, असे मला वाटत नाही. पवारांबद्दल मला आदर आहे, मात्र, मी एनडीचा एक घटक असल्याने आगामी लोकसभेत देखील भाजपसोबत असल्याने पवारांच्या घटक पक्षांना बहुमतच मिळणार नसल्याने, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे ते म्हणाले.

आठवले म्हणाले…
– उदयनराजे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यास आरपीआयची “ऑफर’
– राम मंदिराबाबत सर्वमान्य तोडगा काढावा
– आयोध्येतील राममंदिरात मशिदीबरोबरच बुद्धविहार देखील असावे
– लोकसभेसाठी आरपीआयला मित्र पक्षांनी राज्यातील चार जागा सोडाव्यात
– आरपीआयच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणुकीत 45 जागा जिंकेल
– ओबीसींचे दहा टक्के तर अनुसूचित जातीचे अडीच टक्के आरक्षण वाढवावे
– फ्रान्सकडूनच राफेलच्या किंमतीत वाढ केल्याने खरेदी रकमेत फरक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)