सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे धोरण

“कडेपठार’च्या कार्यक्रमात ज्येष्ठ व्याख्याते डॉ. टाक यांची राज्यकर्त्यांवर टीका
जेजुरी, – स्वातंत्र्यपूर्व काळात देशामध्ये 1904 ते 1912च्या दरम्यान सहकारी चळवळीचा पाया घातला गेला, याची सुरुवात प्रथमतः तत्कालीन राज्य मद्रास व पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झाली. सहकार क्षेत्र हे निकोप लोकशाही टिकवण्याचे प्रभावी माध्यम असून सहकार चळवळ ही ग्रामीण भागातील जिवनप्रणालीचा कणा आहे. दुर्दैवाने सध्याच्या काळात राज्यकर्त्यांकडून सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे धोरण राबविण्याचा प्रकार सुरु असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते डॉ. नारायण टाक यांनी केले.
कडेपठार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 19वी सर्वसाधारण सभा जयमल्हार सांस्कृतिक भवन येथे झाली. या सभेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. टाक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई होते. यावेळी माजी जि.प.सदस्य सुदामराव इंगळे, ऍड. सारिका इंगळे, श्रीमती इंदुमती कुटे, शिवाजीराव शेंडकर, बाजीराव जगदाळे, बापूराव भोर, जिमाचे अध्यक्ष उद्योजक डॉ. रामदास कुटे, रवींद्र जोशी, ज्येष्ठ नेते श्‍यामकांत भिंताडे, रामचंद्र माळवदकर, मेहबूब पानसरे, एन.डी.जगताप, रोहिदास खैरे, आदींसह परिसरातील शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.
डॉ. टाक म्हणाले की, कडेपठार संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत वाटचाल केली आहे. देश भांडवलशाहीकडे प्रवास करीत आहे. त्याच माध्यमातून नोटाबंदी झाली आणि देशासाठी काहीतरी करतोय, या भावनेतून सर्वसामान्य रांगेत दिसला. देशातीला 92 टक्के पैसा रियल इष्टेट मध्ये गुंतवणूक झाल्याची बाब उघड झाली असली तरी नोटाबंदीतून किती काळापैसा बाहेर आला? याचे उत्तर अद्याप तरी अर्थतज्ञांना सापडलेले नाही, असेही टाक यांनी सांगितले.
कडेपठार संस्थेने 19 वर्षाच्या वाटचालीत सर्वसामान्य शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिक यांना केंद्रस्थानी मानत आर्थिक मदतीचा हात देत सामजिक उपक्रम राबविले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. विविध उपक्रम राबवीत सभासदांना 12 टक्के लाभांश देणारी आणि अ दर्जा मिळवणारी कडेपठार ही एकमेव संस्था असल्याचे सुदामराव इंगळे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, डॉ.रामदास कुटे आदींनी मनोगत व्यक्त केले. अहवाल वाचन सचिव अरविंद शेंडकर यांनी केले. सूत्रसंचालन पंढरीनाथ सोनवणे तर बाळासाहेब कामथे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)