सहकारातून समाजकारणाची प्रगती

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ असे ब्रीदवाक्‍य घेऊन राज्याच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा सहकार पहिल्यांदा नगर जिल्ह्यात रोवला गेला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरमध्ये सुरू केला. नेहमी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या नगर जिल्ह्याला ऊर्जितावस्थेत आणले ते सहकार क्षेत्राने. जिल्ह्याचे अर्थकारण व समाजकारण प्रगतीकडे नेत असताना सहकाराने राज्याच्या राजकारणात नगरची प्रगती केली. किंबहुना जिल्ह्यातील राजकारण सहकारावर टिकून आहे, असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.
सहकाराचा पाया घालणारा नगर जिल्हा देशाला दिशादर्शक ठरला आहे. काळानुसार बदल स्वीकारत आता खासगीकरणाच्या वाटेवरही धावू लागला आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल, तसेच किमान दहा लाख लोकसंख्येचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असलेला येथील सहकार जिल्ह्याच्या अर्थकारणाला दिशा देणारा ठरला आहे. शेतीविकास, सिंचन व्यवस्था, दूध व्यवसाय, साखरनिर्मिती, अर्थपुरवठा, पाणीपुरवठा, उद्योग विकास, मजुरी अशा बहुतांश सर्वच क्षेत्रात सहकाराने पाय रोवले आहेत. या सर्व क्षेत्रांत आता खासगी संस्थांचाही सहभाग वाढत असला तरी नवे बदल-तंत्रज्ञान स्वीकारत सहकाराने आपली ताकद कायम राखली आहे. वीजनिर्मितीसह वाटचाल करणारी साखर कारखानदारी एकीकडे, तर मल्टिस्टेटच्या माध्यमातून अन्य राज्यात ठेवी संकलन व कर्जवितरण करणाऱ्या पतसंस्था ही काही येथील बदलत्या सहकार विश्‍वाची उदाहरणे.

जिल्हा सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांसह सहकारी कारखानदार, पतसंस्थांसाठी कामधेनू ठरली आहे. 282 शाखांसह 1304 विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीसाठी मध्यम व दीर्घ मुदत कर्जपुरवठा करणाऱ्या जिल्हा बॅंकेने 5 हजार 248 कोटींवर ठेवी संकलन व 4 हजार 50 कोटींवर कर्ज वितरण केले आहे. राज्यातील मोजक्‍या जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये अग्रस्थान टिकवले आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करणारी सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी, तसेच शेतकरीपुत्र अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा बॅंकेला व तिच्या माध्यमातून जिल्हाभरातील सामान्य शेतकऱ्यांना व विविध सहकारी संस्थांना प्रगतीच्या वाटेवर नेले आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे, भाऊसाहेब थोरात, आबासाहेब निंबाळकर, मारुतराव घुले, बाळासाहेब विखे, यशवंतराव गडाख, डॉ. बाबुराव दादा तनपुरे, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, गोपाळराव सोले अशा दिग्गज सहकारमहर्षींनी आखून दिलेल्या वाटेवर पुढची पिढी बॅंकेला पुढे नेत आहे.

नागरी सहकारी बॅंका जिल्ह्याच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहेत. मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांना उद्योग-व्यवसायांसाठी आर्थिक मदतीचा हात देण्यात नागरी सहकारी बॅंकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे नियमांचे जंजाळ अडचणीचे ठरत असताना नागरी सहकारी बॅंकांनी व्यक्तीची गरज ओळखून तिला दिलेले प्राधान्य महत्त्वाचे ठरले. त्यात नगर अर्बन बॅंक, मर्चंट्‌स बॅंक, शहर सहकारी बॅंक तसेच प्रवरा बॅंक व अन्य नागरी बॅंका जिल्ह्याच्या विकासाच्या भागीदार ठरल्या आहेत. दोन हजार कोटींवर उलाढाल नागरी बॅंकांनी गाठली आहे. आज राष्ट्रीयीकृत बॅंकांसह खासगी बॅंकांचे आव्हानही उभे असतानाही नागरी बॅंकांनी इंटरनेट बॅंकिंगचा अंगीकार करून व अत्याधुनिक सोयीसुविधा देऊन सहकारावरील विश्‍वास टिकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता तर नागरी बॅंका मल्टिस्टेटच्या माध्यमातून अन्य राज्यातही आपले नाव पोहोचवू लागल्या आहेत.

पगारदार पतसंस्था व नागरी पतसंस्था मिळून 1117 संस्थांनी पत नसलेल्यांची पत निर्माण करण्यास प्राधान्य दिल्याने छोटा कष्टकरी वर्ग विकासाच्या प्रवाहात आला आहे. छोट्या-मोठ्या व्यवसायाची छोटी-मोठी गरज भागवताना प्रसंगी त्या गरजेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीची भावना ठेवली गेल्याने हातगाडीवाले वा तत्सम छोटे व्यवसाय करणारे आपल्या व्यवसायात विविध सुविधा निर्माण करू शकले. यातून त्यांचे उत्पन्न वाढले व पतसंस्थांसारख्या छोट्या आर्थिक संस्थांची ताकदही वाढली. बदलत्या काळानुसार पतसंस्थाही इंटरनेट बॅंकिंगसारख्या सुविधांचा अंगिकार करू लागल्या आहेत. बाराशे कोटींवर पतसंस्थांची उलाढाल पोहोचली आहे. काही पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार केला असून महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश यासह अन्य राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. मल्टिस्टेट परवान्याच्या माध्यमातून अन्य राज्यांत ठेवी संकलन व कर्ज वितरणाद्वारे उत्पन्नवाढीचे नवनवे मार्ग शोधले आहेत. सहकार क्षेत्राने प्रामाणिकपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका नक्कीच बजावली, हे मात्र स्पष्ट आहे.

      प्रशांत भालेराव

संस्थापक, रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)