सहकाराची वाटचाल सुपंथाकडून स्वपंथाकडे! 

सहकार चळवळीने शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण केली. “एकमेका साह्य करू.. अवघे धरू सुपंथ” हे ब्रीद सहकाराने स्वीकारून अवघे जग ज्या समाजवादासाठी झगडत होते ते तत्व सहकाराने सहजासहजी साकारले. सहकाराच्या मंत्राने शेती, शेतकरी आणि एकूणच ग्रामीण भागात क्रांतीची प्रक्रिया सुरू झाली. सहकाराच्या मंत्राने ग्रामीण भाग भारावून गेला. या भारावलेपणातून सहकारी संस्थारुपी ग्रामीण परिवर्तनाची मंदिरे उभी राहिली. 

स्वातंत्र्योत्तर 25 वर्षे सहकाराचे सुवर्णकाळ ठरले. या कालखंडात अनेक साखर कारखाने, दुग्ध संस्था, फळप्रक्रिया संस्था, कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग, सूतगिरणी, बॅंका अशा सहकारी प्रकल्प, तसेच संस्थांचे जाळे निर्माण झाले. या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे स्वरूप पालटले. शेतकऱ्याला अर्थशास्त्र कळू लागले. आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाविषयी तो जागरूक बनला. संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नेतृत्वाला विकासाची संधी मिळाली. यातूनच पुढे राज्याला नेतृत्व देण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्‍ती उदयास आल्या. सहकारी संस्था या कार्यकर्ते आणि नेतृत्वाची खाण बनली. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या प्रकल्प, उद्योगांनी ग्रामीण भागात मोठा रोजगार मिळवून दिला. गावच्या माणसाला त्याच्या गावीच ठेवण्याचे मोठे काम केले. याची दखल सहकाराच्या टीकाकारांनाही घ्यावीच लागेल.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून पुढे संलग्न संस्था उभ्या राहिल्या. या संलग्न संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागाला उपलब्ध झाल्या. शेतकऱ्यांची मुलं शिकायला लागली. एरवी ज्या उच्च शिक्षणासाठी मुंबई-पुण्याशिवाय पर्याय नव्हता अशा उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा सहकारी संस्थांच्या संलग्न संस्थांद्वारे उपलब्ध झाल्या. ग्रामीण भागातून मग डॉक्‍टर, इंजिनिअर, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ तयार होऊ लागले. सहकाराने केवळ कृषी विकासाचे आणि आर्थिक परिवर्तनाचेच काम केले असे नाही, तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात योगदान दिले. सहकारी चळवळीने ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठीचे योगदान सहकारातील दोष स्वीकारूनही नाकारता येणार नाही.

आणीबाणीच्या कालखंडानंतर म्हणजे 1975 च्या सुमारास राजकारणाचे स्वरूप आणि संदर्भ बदलले. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्‍वभूमी लाभलेले आणि तत्वांनी भारलेली माणसे अस्तगत होऊन तत्कालीन तरुण पिढी राजकीय, सहकार तसेच सामाजिक क्षेत्रात अवतरली. राजकारणातून आणि समाजकारणातून तत्वांची, मूल्यांची पिछेहाट सुरू झाली. तत्वाऐवजी “अर्थ’कारणाला महत्त्व येऊ लागले. लोकमान्यता, लोकाभिमुखता या निकषांऐवजी निवडून येण्याची “कुवत’ महत्त्वाची ठरू लागली. यामुळे राजकारणातला, सहकारातला, सामाजिक आशय संपून या क्षेत्रांना व्यावसायिक स्वरूप यायला सुरुवात झाली. सध्याच्या राजकीय अध:पतनाच्या विनाशाची ही पायाभरणीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.ऐंशीच्या दशकात सहकाराच्या जोडीनेच खासगी कारखानदारीही होती. खासगी आणि सहकारी क्षेत्रात एकमेकांत स्पर्धा होती. खासगीकरणाने सहकारापुढे आव्हान निर्माण केले होते.

सप्टेंबर 1983 चा “शुगर केन एरिया रिझर्व्हेन ऍक्‍ट उर्फ झोन’ कायद्याने खासगी कारखान्यांना वेसण घातली. ज्याचे त्याचे कार्यक्षेत्र “अबाधित’ बनल्याने खासगी कारखान्यांची नाकेबंदी झाली. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस एखाद दुसरा अपवाद वगळता जवळपास एकूणच खासगी कारखानदारांची अखेर झाली. खासगी कारखानदारीचा अस्त सहकाराच्या सूत्रधारकांच्या बळकटीकरणास कारणीभूत ठरला. एका अर्थाने खासगी कारखान्यांचे युग सरून सहकारी क्षेत्रातील मक्‍तेदारी आणि घराणेशाहीच्या पर्वाचा आरंभ झाला.हे पर्व सहकाराच्या मक्तेदारीचे, घराणेशाहीच्या आरंभापेक्षा सहकाराच्या अध:पतनाची सुरुवात मानली पाहिजे. खासगी कारखान्यांचे आव्हान गळून पडले. सहकार हे विकेंद्रीकरण आणि नेतृत्वाला संधी देणारे माध्यम सत्ता आणि राजकारणाचे केंद्र बनले. एकमेकांच्या साहाय्याने परस्परांचा विकास आणि “अवघे धरू सुपंथ’ ऐवजी सहकार हा सत्ता आणि स्वार्थाचा महामार्ग झाला. या प्रक्रियेतून सहकाराला सत्ताकारण आणि राजकारणाने घेरले. ग्रामीण परिवर्तनाची मंदिरे मानल्या जाणाऱ्या सहकारी संस्था राजकारणाचा अड्डा बनल्या. ज्या सावकारीच्या आणि भांडवलशाहीच्या पाशातून मुक्‍त करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या चळवळीने शेतकरी, सभासद आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलले.

सहकारातली लोकाभिमुखता, विकेंद्रीकरण, सामूहिक विकास, परिवर्तन या सर्वांचा “गर्भपात’ झाला. सहकाराच्या नव्या गर्भधारणेतून सम्राट, महर्षी जन्माला आले. सहकाराची धुरा सांभाळणाऱ्यांनी सहकारी संस्थांचे संस्थानात रूपांतर केले. मातृसंस्था तोट्यात तर विश्‍वस्त संस्थांची भरभराट अशी स्थिती निर्माण झाली. सहकाराला भ्रष्टाचार आणि अपप्रवृत्तीचे ग्रहण लागले.सहकारी चळवळीच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा परामर्श घेताना असे वास्तव समोर येते. ज्या सहकाराने सहकारी संस्थांच्या कारभाऱ्यांना भरभरून दिले त्याच सहकाराचा त्यांच्याच हातून घात झाला. खरे तर सहकाराला समाजवादी चळवळ बनविण्याची, विकासाचे माध्यम आणि एकूणच सर्वंकष परिवर्तनाची चळवळ बनविण्याची संधी सहकार हाकणाऱ्यांना मिळाली होती. ती संधी वाया घालवली, असेच म्हणावे लागेल. सहकाराच्या कारभाऱ्यांनी मनापासून ठरवलं असतं तर आज ग्रामीण विकासाचा एक वेगळा “कॅनव्हॉस’ उभा राहिला असता. असे घडले नाही.

सहकाराच्या कारभाऱ्यांनी सहकारात वेगळेच रंग भरून सहकाराला कडेलोटाच्या स्थितीपर्यंत आणून ठेवले आहे.सहकाराच्या चळवळीचा अंत होणे ही ग्रामीण विकासाची आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या केवळ शेतकरीच नव्हे तर सर्व घटकांची शोकांतिका ठरणार आहे. कदाचित आगामी दशक हे सहकाराच्या युगाच्या अंताचे ठरेल. यास सहकाराचे कारभारीच कारणीभूत असतील. खासगी कारखाने आणि भांडवलशाही सावकारी शोषण व्यवस्था संपविण्यासाठी सहकार जन्माला आला. त्याचेच शोषण करून सहकाराच्या रखवालदारांनीच स्वत:चे खासगी कारखाने काढावेत. याला काय म्हणावे? खासगी कारखाने आणि भांडवलदारी संपली. आता नव्याने खासगीकरणाच्या प्रवासास सुरुवात झाली आहे. भांडवलदारांच्या जागा सहकारातून मालामाल झालेल्यांनी घेतली. अशा तऱ्हेने शंभर वर्षांच्या वाटचालीनंतर खासगीकरण-सहकारीकरण ते पुन्हा खासगीकरणाचे वर्तुळ पूर्णत्वास जात आहे. दुर्दैवाने सहकाराचे शोषण करणारे या वर्तुळात, तर सहकाराचे लाभधारक, सभासद व शेतकरी मात्र या वर्तुळाच्या परिघाबाहेर असतील याची खंत वाटते.

– भास्कर खंडागळे 
जनरल मॅनेजर (अशोक सह. सा. का. लि., अशोकनगर) 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)