ससूनमध्ये पहिल्यांदाच यकृत प्रत्यारोपण

पंचवीस ते तीस लाखांची शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्‍यात

पुणे – एकीकडे खासगी रुग्णालये शंभर यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे सांगत आहेत, तेथे दुसरीकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाने पहिल्यांदाच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे जाहीर केले आहे. शासकीय रुग्णालये याबाबत किती पिछाडीवर आहेत, याचा प्रत्यय जरी येथे येत असला, तरीही सामान्यांसाठी हे पहिले यकृत प्रत्यारोपण दिलासादायक आहे. यामुळे गरीबांना आजवर जे प्रत्यारोपण पंचवीस ते तीस लाखांच्या घरात जात होते ते आठ ते दहा लाख रुपयांत शक्‍य होणार आहे.

ससून रुग्णालयात 22 ऑगस्ट रोजी यकृत प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया साताऱ्यातील 58 वर्षीय निवृत्त शिक्षकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्यातील 17 शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करुन यशस्वी करणारे पहिलेच रुग्णालय ठरल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

दि. 22 ऑगस्ट रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात 37 वर्षीय तरूण “ब्रेन डेड’ झाला होता. त्यावेळी त्याचे अनेक अवयवदान करण्यात आले होते. त्यापैकी त्याचे यकृत “ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून ससून रुग्णालयातील या 58 वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून यकृताच्या दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्‍तीला यासाठी खासगी रुग्णालयात केवळ शस्त्रक्रियेचा खर्च 22 लाख रुपये सांगण्यात आला होता. खर्च परवडत नसल्यामुळे ससून रुग्णालयातून पहिल्यांदाच यकृतप्रत्यारोपण करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. येथे त्यांना आठ लाख रुपये खर्च आला आहे.

या डॉक्‍टरांच्या टीमने केले यशस्वी प्रत्यारोपण
डॉ. कमलेश बोकील, डॉ. संतोष थोरात व परिचारिका धारणा जगताप हे पथक “ब्रेन डेड’ रुग्णाचे यकृत आणण्यासाठी सोलापूर येथे गेले होते. तर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या पथकात डॉ. शीतल धडफळे, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. वंदना दुबे, डॉ. किरण जाधव, डॉ. अजय तावरे, भूल तज्ज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी, डॉ. हरीश टाटिया या डॉक्‍टरांचा सहभाग होता. अधिसेविका राजश्री कोरके , परिचारिका स्वाती डोईफोडे, तारिका राऊत, अनिता धिंडहाळ, सुनीता अहिरे तसेच अर्जुन राठोड व संदीप खरात यांनी सहकार्य केले.

मूत्रपिंडासाठी 17, तर यकृतासाठी पाच जण वेटिंगवर
रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण होत असल्यामुळे आता तेथे आणखी पाच रुग्णांनी प्रत्यारोपणासाठी नोंद केली आहे. केवळ “ब्रेन डेड’ रुग्णाचे नव्हे, तर जिवंत दाता असलेलेही प्रत्यारोपण आता तेथे होणार आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 17 रुग्णांनी नोंद केल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

ह्रदय प्रत्यारोपणदेखील लवकरच
ससून रुग्णालयात लवकरच ह्रदय प्रत्यारोपणही होणार आहे. कारण, रुग्णालयाने तसा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. त्याअनुषंगाने तेथे पाहणी देखील झाली असून आता लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा डॉ. चंदनवाले यांनी व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)