ससूनतर्फे मासिक पाळी स्वच्छता सप्ताह जनजागृती

पुणे – “मे’ हा “जागतिक मासिक पाळी स्वच्छता महिना’ म्हणून पाळण्यात येतो. त्यामुळेच ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे रज:काल स्वास्थ सप्ताह म्हणजेच पाळीच्या दिवसातील स्वच्छता कशी राखावी याबाबतच्या जनजागृतीपर सप्ताहाचे आयोजन 28 मे ते 4 जून केले आहे.

महिलांपैकी सुमारे 52 टक्‍के महिलांना दरमहा मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता बाळगणे अत्यंत आवश्‍यक असते अन्यथा जंतूसंसर्ग होऊन पांढरा स्त्राव, पोटदुखी, कंबर दुखी व कालांतराने वंध्यत्व असे आरोग्याचे प्रश्न उद्‌भवू शकतात. त्यामुळेच याची जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून हा सप्ताह पाळण्यात आला. यानिमित्त 28 मे ससून बाह्यरुग्ण विभागात पोस्टर प्रदर्शन, स्पर्धा झाली. 29 मे रोजी “सहेली संघ” या संस्थेच्या आयोगाने “बुधवार पेठ” येथे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 30 मे रोजी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विषय व विशेष साधन व्यक्ती महिला यांच्यासाठी विद्यानिकेतन मनपा शाळा क्र.1 येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या प्रशिक्षणादरम्यान शाळकरी मुलींकरिता “मासिक पाळीतील स्वच्छतेचे व्यवस्थापन” शिकविण्याबरोबरच त्यासाठी आवश्‍यक सुविधा उदा. पॅड्‌स, सॅनिटरी नॅपकिन, पाणी, साबण व प्रसाधनगृहे यांची तजवीज करण्यावर भर देण्यात आला. या सप्ताहात सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी प्रबोधनपर पथनाट्य, समुपदेशन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दि. 31 मे रोजी सर्व डॉक्‍टर्स, अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नर्सिंग स्टाफ यांनी “जनजागृती रॅली”त सहभाग घेतला. रॅलीचे उद्‌घाटन करताना अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.
दि. 1 जून रोजी नर्सिंग स्टाफ व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, तसेच डॉ. रेणू भारद्वाज यांचे “रज:काल स्वास्थ्य व जैवसुरक्षा” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच या दिवशी “नागपूर चाळ” येथील महिलांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 2 जून रोजी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे पोलीस महिला कर्मचारी यांच्यासाठी तज्ज्ञांतर्फे व्याख्यान व मंगळवार पेठेतील अर्बन हेल्थ सेंटर येथे महिलांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सप्तहाच्या कार्यक्रमात डॉ. रमेश भोसले, डॉ.सविता कांबळे, डॉ. शिल्पा नाईक, डॉ. रुची ठाकूर व स्त्रीरोग विभाग सहभागी झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)