सशस्त्र जवान मशिदीत जातात तेव्हा…!

तुषार रंधवे

पिंपरी – वेळ सायंकाळी पावणे सहाची… 20-25 सशस्त्र लष्करी जवान एका धार्मिक स्थळाजवळ जमतात…, त्यापैकी काही जण आत जातात तर काही जण बाहेरच थांबतात. या धार्मिक स्थळाच्या बाजूला थांबलेल्या सशस्त्र जवानांमुळे अनेकांच्या भुवया उंचवतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आणि अंदाजांचे पिक काही क्षणातच फोफावते. मात्र या घटनेची खात्री केली असता सरावादरम्यान दुसरीकडे जात असताना नमाज पठणाची वेळ झाल्याने मुस्लिम जवान या मशिदीत थांबले होते. आपल्या सहकाऱ्यांचे नमाज पठण होईपर्यंत इतर जवान त्यांची शस्त्रे घेऊन बाहेर थांबले होते. देशात जर सर्वधर्म समभाव जर कुठे असेल तर तो सैन्यात पहायला मिळतो, असे म्हटले जाते त्याचे हे ज्वलंत उदाहरण पहायला मिळाले. सत्य बाहेर येईपर्यंत बऱ्याच चर्चा सुरू होत्या. सत्य समोर आल्यावर तेथील नागरीक म्हणाले कभी तो अच्छा सोचो यार…

मागील आठवड्यात बांगला देशातील दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दोन जणांना आकुर्डीतून तर एकाला पुण्यातून अटक केली. एटीएसने ही कारवाई केली. त्यानंतर सरहद्दचे संजय नहार यांच्या नावाने निघालेल्या “पार्सल बॉम्ब’ मुळे जिल्ह्यात संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (दि.22) सशस्त्र लष्करी जवान एका धार्मिक स्थळी घुसल्याचा अनेकांचा गैरसमज झाला.
याबाबत अधिक माहिती घेतली असता कळाले की, लष्करी जवानांच्या एका तुकडीचे प्रशिक्षण दिघीतील लष्करी केंद्रात सुरु आहे. मात्र, पुढील प्रशिक्षणाकरिता त्यांना अहमदनगरला पाठविण्यात आले. ही तुकडी अहमदनगरच्या दिशेने रवाना होत असताना प्रवासदरम्यान त्यांची वाहने आळंदीत आली.

या तुकडीत काही मुस्लिम जवानांचा समावेश होता. सायंकाळी नमाजची वेळ झाल्याने नमाज अदा करण्याची इच्छा त्यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांकडे व्यक्‍त केली. त्यानंतर आळंदीतील खंडोबा मंदिर रस्त्यावरील मशिदीचा शोध घेतला. त्यानंतर या तुकडीतील सर्व मुस्लिम जवान नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेले. तर अन्य धर्माचे जवान मशिदीच्या आसपास उभे होते. या धार्मिक स्थळाबाहेर सशस्त्र जवानांच्या उपस्थितीमुळे यामुळे अनेकांचा गैरसमज झाला. एखादी गोपनीय कारवाईची शक्‍यता वतविण्यात आली. मात्र, सत्य समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास टाकला.

याबाबत आळंदी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. अशा घटनांमुळे समाजातील एकोपा वाढण्यास हातभार लागत असल्याचे मत व्यक्त केले.

काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज इरफान पठाण हा एका सामन्यात सहभागी होण्याकरिता गहुंजे येथे आला होता. त्याला देखील नमाज पठण करावयाचे होते. त्यासाठी तो चाकणमधील मशिदीत आला होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी चाकणमध्ये एकच गर्दी जमा झाली होती. अशा घटनांमुळे समाजात जातीय सलोखा किती घट्ट रुजला आहे, याची प्रचिती यते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)