सव्वालाख पुणेकरांना “स्वास्थ विमा’ लाभ

1300 आजारांवरील उपचारांसाठी मिळणार 5 लाखांची मदत
2011 च्या जनगणना निकषांवर कुटुंबांची निवड

पुणे – हालाखीच्या आर्थिक स्थितीमुळे वैद्यकीय उपचार घेण्याची क्षमता नसलेल्या पुणे शहरातील 1 लाख 23 हजार कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत वेगवेगळ्या स्वरुपातील 1300 आजारांवरील उपचारांसाठी 5 लाखांची मदत या योजनेंतर्गत केंद्राकडून थेट या कुटुंबियांना मिळणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रशासनाने पाठविलेल्या माहितीच्या आधारावर शहरातील या सर्व कुटुंबांचे फेर सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर तातडीने या योजनेची अंमलबजाणी सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ विमा योजनेंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना औषधोपचारांसाठी पाच लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकांना देण्यात आले आहेत. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्यावेळी केवळ जनगणना न करता सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नावर आधारीत कुटुंबांचीही जनगणना करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची संख्या 1 लाख 23 हजार इतकी आहे. त्याच्या याद्या महापालिकेकडे उपलब्ध आहेत. या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश केंद्राकडून महापालिकेस देण्यात आले आहेत. त्यानुसार, कमीत कमी वेळेत या योजनेची अंमलबजाणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिका करणार फेर सर्वेक्षण
योजनेच्या अंमलबजावणीसाठी या कुटुंबांचे आणि त्यातील सदस्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लाभार्थी निश्‍चित करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या सर्वेक्षणाच्या कामासाठी समुह संघटीका आणि महिला बचतगटांची मदत घेण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. सर्वेक्षणादरम्यान संबंधित कुटुंबांतील सदस्यांची माहिती, सद्य आर्थिकस्थिती, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती गोळा करण्यात येईल. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्यांना 1300 आजारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतील. महापालिकेच्या शहरी-गरीब योजनेप्रमाणे उपचाराची बिले थेट संबंधित रुग्णालयांना देण्यात येतील, अशा पध्दतीने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आर्थिक दुर्बलांना दिलासा
निर्णयामुळे शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर आजारांचे उपचार या नागरिकांना आर्थिक स्थितीमुळे परवडत नाहीत; तर महापालिकेकडून अशा नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचाराची रक्कम तुलनेने कमी आहे. त्यामुळे उपचारासाठी 5 लाखांची मदत मिळणार असल्याने या कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी मोठा आर्थिक हातभार मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)