सवाई सर्जाच्या जयघोषात पारंपारिक “मारामारी’ साजरी

सवय सर्जाचा जयघोष करीत गुलाल-खोबऱ्याची उधळण

परिंचे- श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस “मारामारी’ लाखो भाविकांच्या उपस्थितीत रंगाची उधळण करीत साजरी करण्यात आली.
गुरुवार (दि. 28) मारामारी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी उत्सव मूर्तीची पहाटे पूजा करून मूर्तींना अभिषेक घालण्यात आला. वीरची मानाची पालखी देऊळवाड्यात होती. दुपारी बारा वाजता प्रथम कोडीतची मानाची पालखी देऊळवाड्यात आली. पाठोपाठ कन्हेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील 20 गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काठ्या ढोल-ताशांसह अबदागिरी, निशान, छत्री, दागिनदार, सालकरी सर्व मानकरी मंदिरात आले.
सर्व मानाच्या पालख्यांनी काठ्यांसह तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळवाड्यातील दगडी कासवावर भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली. यामध्ये वेळेवर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सव्वास सव्वाशेर मिळेल. पाऊस चार खंडात पडणार असून शेतकरी राजा सुखी होणार असल्याचे सांगितले. भाकणुकीनंतर दुपारी दीड वाजता रंगाची शिंपण मानकरी जमदाडे यांच्या मार्फत करण्यात आली. एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व पालख्या आपापल्या स्थळी गेल्या. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई, स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष संभाजी धुमाळ उपस्थित होते.
यात्रा काळात सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, पोलीस मित्र संघटना, गावातील तरुण मंडळ, ग्रामस्थ यांनी यात्रा पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)