‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ दि. 12 ते 16 डिसेंबरदरम्यान

पुणे – आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवार दि. 12 ते 16 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकूल येथे होणार आहे. महोत्सवाचे हे 66 वे वर्ष असून या महोत्सवामध्ये 31 कलावंत आपला कलाविष्कार सादर करणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी फिनोलेक्‍सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, गोखले कन्स्ट्रक्‍शन्सचे विशाल गोखले, पृथ्वी एडिफिसचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक अभय केले, आशा पब्लिसिटीचे चंद्रकांत कुडाळ, बुलडाणा अर्बनचे शिरीष देशपांडे उपस्थित होते.

“यावर्षी महोत्सव नवीन जागेत होणार आहे. त्यामुळे आम्हालाही उत्सुकता आहे. रसिकांनी आतापर्यंत भरघोस प्रतिसाद आणि दाद दिली. त्यामुळे या वर्षीच्या महोत्सवाचा बदल स्वीकारत रसिक श्रोते यावर्षीही महोत्सवाच्या पाठीशी उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे,’ असे जोशी म्हणाले.

बुधवार दि. 12 डिसेंबर या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी 3 ते रात्रौ 10 अशी महोत्सावाची वेळ असेल. गुरुवार दि. 13 डिसेंबर व शुक्रवार दि 14 डिसेंबर रोजी महोत्सवाला दुपारी 4 वाजता सुरुवात होईल तर रात्रौ 10 वाजेपर्यंत महोत्सव सुरु राहील. शनिवार दि. 15 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता महोत्सवाला सुरुवात होईल व आधीच परवानगी मिळाल्याने महोत्सव रात्रौ 12 पर्यंत चालेल. रविवार दि. 16 डिसेंबर हा महोत्सवाचा शेवटचा दिवस असून त्यादिवशी दुपारी 12 ते रात्रौ 10 या वेळेत महोत्सव पार पडेल.

पहिल्या दिवशी औरंगाबादचे कल्याण अपार यांच्या सनई वादनाने दुपारी 3 वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. बसंत काब्रा यांचे सरोद वादन होईल. प्रसाद खापर्डे गायन, परवीन सुलताना यांचे गायन होईल. यानंतर दि. 13 रोजी डॉ. रिता देव, सौरभ साळुंखे यांचे गायन, संतूरवादक राहुल शर्मा यांचे संतूर वादन तसेच पं. अजय पोहनकर यांच्या गायन, दि. 14 रोजी अपर्णा पणशीकर, रागी बलवंत सिंग यांचे गायन होणार आहे. त्यानंतर मिलिंद रायकर व यज्ञेश रायकर हे व्हायोलिन वादन करतील. त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकरांचे गायन होईल. दि. 15 रोजी दत्तात्रय वेलणकर, सावनी शेंडे यांचे गायन, विवेक सोनार यांचे बासरीवादन, भीमसेन जोशींचे पुत्र श्रीनिवास जोशी व देवकी पंडित यांचे गायन होईल. पं. गोस्वामी गोकुलोत्सव महाराज, उस्ताद शाहीद परवेज यांच्या सतार वादन होईल. दि. 16 रोजी अर्शद अली व अमजद अली, अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांचे सहगायन होणार आहे.

वीणावदक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिन वादक इंद्रदीप घोष हे सहवादन, संजीव अभ्यंकर यांचे गायन, प्रतिक चौधरी हे सतारवादन करतील. ज्येष्ठ कथक गुरु पं. बिरजू महाराज आणि त्यांची शिष्या शास्वती सेन यांची कथक प्रस्तुती होईल आणि परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)