राजगुरूनगर- येथे पुणे-नाशिक महामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिकांसह प्रवासी हैराण झाला आहे. ही वाहतूक कोंडी कायमच प्रवाशांच्या नशिबी आल्याची प्रतिक्रिया या माहार्गावरून जाणारे प्रवासी देत आहेत. प्रशासन, राज्यकर्ते यांना सर्वसामान्य प्रवासी नागरिकांचे काही एक घेणेदेणे नसल्याने वर्षानुवर्षे या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लागत असल्याने वाहतूक कोंडीचे ठिकाण म्हणजे राजगुरुनगर व चाकण बनले असल्याची प्रतिक्रिया प्रवसी देत आहेत.
शनिवार ते मंगळावर अशा सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने आणि त्यातच उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि आता लग्नसराई जोरात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आली आहेत. एकीकडे भयंकर उन्हाळा तर दुसरीकडे वाहतूक कोंडी यात प्रवाशांचा जीव कासावीस होत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर शहरातील भीमा नदीवरील अरुंद पुल, शहरातील एसटी बस स्थानकाजवळील अरुंद पूल ही राजगुरुनगर शहरातील वाहतूक कोंडीची प्रमुख करणे आहेत. यावर गेली 50 वर्षांत कोणीही पर्याय काढला नाही. मागील पाच वर्षांपासून बाह्यवळणरस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, उदासीन शासन आणि अकार्यक्षम पुढारी यांच्यामुळे हे काम होत नसल्याने प्रवाशी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अजूनही दोन वर्षे नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार नाही.
असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने
आजपासून सलग चार दिवस सुट्टी असल्याने पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आली आहे. त्यातच राजगुरुनगर शहरात प्रवेश होताच अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी झाली. उन्हाचा पार 40 अंशावर होता. त्यातच वाहतूककोंडी झाल्याने अनेक लहान मुलांचे वृद्ध नागरिकांचे हाल झाले. आज लग्नाची मोठी तिथी असल्याने राजगुरुनगर ते मोशीपर्यंत मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठी विवाह कार्यालये असल्याने महामार्गालात वाहनाची पार्किंग केली जाते. पार्किंगमुळे आणि लग्न मंडपात जाण्यासाठी स्थानिक नागरिक वाहतूक कोंडीचा विचार करीत नाहीत उलट रस्त्याने जाणाऱ्या मोठा अवजड वाहन चालकांशी हुज्जत घालत वाहतूक कोंडी भर टाकताना ढळतात. तर मंगलकार्यालयाचे मालक याकडे लक्ष देत नसल्याने वाहतूक कोंडीला राजगुरुनगर चाकण परिसरात पर्याय निघत नाही. एकीकडे उन्हाचा पारा वाढत होत आहे तर दूसरीकड वाहतूक कोंडीत वाढ होत आहे अशा दुहेरी प्रकारामुळे प्रवाशांचे मात्र, अतोनात हाल होत आहेत. वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे हे एक प्रमुख कारण बनले आहे. या महामार्गावरून दिवसभरात मोठ्या प्रमाणात जड-अवजड कंटेनर आदी वाहने जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
- प्रशासन या समस्येकडे लक्ष कधी देणार?
राजगुरुनगर-चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी रोखण्यासाठी जड अवजड आणि कंटेनर वाहतूक दिवसा करू नये अशी अनेकदा मागणी करूनही ती सुरूच आहे. याबाबत पोलीस प्रशासन जिल्हाअधिकारी प्रशासन नागरिकांच्या या समस्यांकडे लक्ष देणार कधी हा सवाल प्रवाशांना पडला आहे. किमान एप्रिल मे महिन्यात जड अवजड वाहनावर दिवसा जाण्यास बंदी घालावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा