सर्व प्रकारची सिद्धी देणारा “सिद्धिपती’ (गणेश नाममाहात्म्य)

अष्टसिद्धींचा पालक तो सिद्धिपती. सर्वांच्या ठिकाणी असणारी सर्व प्रकारची ज्ञानसत्ता, एका गणेशाच्याच हाती आहे. त्याच्या बुद्धीचा चालक मात्र दुसरा कोणीच नाही. अर्थात बुद्धियुक्त होऊन जे कर्म केले जाते, त्याचे यथायोग्य फळही तोच देतो. म्हणून सर्व प्रकारची सिद्धी देणारा “सिद्धिपति’ तोच आहे.

दंभासुराच्या नाशासाठी ब्रह्मदेवादी परमेश्‍वरांनी तपश्‍चरण केल्यावरून ब्रह्मदेवाच्या ध्यानापासून गणेशाने “सिद्धिबुद्धिपति’ नावाचा अवतार धारण केला. येथील सिद्धिबुद्धिपति नामाचा अर्थ असा की भुक्तिसिद्धी, मुक्तिसिद्धी किंवा कैवल्यसिद्धी, जे जे काही मिळवावयाचे असते ते सर्व सिद्धीचे स्वरूप आहे. अशा रीतीने त्या सिद्धीचा पती गणेश सर्वस्वाचेच मूळ ठरतो, तसेच बुद्धीचे स्वरूप ज्ञानमय असते. नामरूपात्मक विश्‍व नानाकारांनी संपन्न असले तरी तद्रूप ज्ञानसत्ता एकाच अखंड स्वरूपाची असते. अशा बुद्धीचा पती गणेश. सारांश, त्याचे साक्षात परब्रह्मस्वरूपत्वचया “सिद्धिबुद्धिपति’ नावावरून जाणावयाचे आहे. हा समग्र विश्‍वविलास व ब्रह्मविहारसुद्धा स्वानंदनाथ प्रभूने आपल्या लीलाविलासासाठी निर्मिला आहे. स्वत: तोच मायेच्या आश्रयाने नानाकार झाला आहे. अर्थात त्याचे नानाकार सत्तारूप ज्ञानमय असल्यामुळे तो बुद्धीचे स्वरूप ठरले आहे. तेथील भिन्न भिन्न स्वरूपाच्या प्रत्ययाचे भान हे सिद्धीचे स्वरूप आहे. अशा मोहदायिनी सिद्धी व मोहधारिणी बुद्धी या दोन मायांच्या आश्रयाने क्रीडा करणारा त्यांचा पती तो “सिद्धिबुद्धिपती’ नावाने वेदांनी स्तविला आहे.

– दीपक कांबळे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)