- स्वामी-चिंचोलीत धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष वासुदेव काळे यांचे प्रतिपादन
- पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प आणि धरणग्रस्त संघटनेच्या वतीने प्रकल्प आणि धरणग्रस्त संवाद परिषदेचे आयोजन
राजेगाव – जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी धरणग्रस्तांचा वापर केवळ निवडणुकीच्या तोंडावर प्रश्न सोडविण्याचे गाजर दाखविण्यासाठी केला गेला. यापुढे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अभ्यासपूर्ण आणि सनदशीर मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करू. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे अशा स्वरूपाचे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न तसेच आहेत. एकट्याने लढल्यामुळे दोन पिढया संपल्या तरीही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र धरणग्रस्त संघटनेचा लढा सुरू राहील, अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प आणि धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
स्वामी-चिंचोली (ता. दौंड) येथील हवा मल्लीनाथ मठामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प आणि धरणग्रस्त संघटनेच्या वतीने प्रकल्प आणि धरणग्रस्त संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोशिमघर येथील ज्येष्ठ प्रकल्पग्रस्त शेतकरी जगन्नाथ कडु पाटील होते. यावेळी उजनी प्रकल्पग्रस्त संघटनेचे प्रमुख तुकाराम सरडे, भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, शहाजी जाधव, केशव जगताप, गजानन जगताप, अशोक गायकवाड, नानासाहेब पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना उजनी प्रकल्पग्रस्त संघटनेचे प्रमुख तुकाराम सरडे म्हणाले की, धरणग्रस्त त्याच्याकडील जमीन, घर व मालमत्ता गेल्यामुळे दुबळा झाला. असंघटित प्रकल्पग्रस्तांची शासकीय पातळीवर प्रतारणा झाली. दलालांकडूनही फसवणूक झाली. शासनाने मंजूर केलेल्या अनेक बाबी अधिकाऱ्यांच्या बेफिरीमुळे आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे मिळाल्या नाहीत. येळवंडे धरणग्रस्तांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेला लढा हा राज्यामध्ये आदर्श आहे. यापुढील काळांमध्ये येळवंडे धरणग्रस्तांचा आदर्श पुढे ठेवून प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारण्याची आवश्यकता आहे.
प्रवीण लोंढे, राजेश राऊत, तुकाराम अवचर, संदीप लगड, रामराजे शिंदे, सुहास गलांडे, हनुमंत कन्हेरकर आदींसह शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी परिषदेत मांडल्या. प्रास्ताविक मारुती वणवे यांनी, तर सूत्रसंचालन मनोज फडतरे यांनी केले आणि आभार विकास काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन राजेश राऊत, रामराजे शिंदे, बाळासाहेब ढमे, राजेंद्र जमदाडे, दिनेश मारणे यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा