सर्वोत्तम बनण्यासाठी परिश्रमांची गरज

निघोज – “ध्येय गाठण्यासाठी कार्याशी एकरूप होणे सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षण ही आपल्या देशाची खरी संस्कृती आहे. या संस्कृतीच्या माध्यमातून देशाचा विकास झाला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वोत्तम होण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.

पारनेर तालुक्‍यातील निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन शर्मा यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. सहदेव आहेर अध्यक्षस्थानी होते. भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर प्रमोद कालिया, युवा करिअर ऍकॅडमीचे संचालक किरण रहाणे, मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख आनंद पाटेकर, पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, मुख्याध्यापक बी. बी. घोलप, एकनाथ पठारे, किरण पाडळकर यावेळी उपस्थित होते.

शर्मा यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास यावेळी सांगितला. ते म्हणाले, “”आदिवासी भागात शिक्षण घेताना दोन ते चार कि.मी. गुडघाभर चिखलातून चालत गेलो. शाळेला जात असतानाच देशातील उच्च अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याचा संकल्प केला होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतल्यास काहीही अडचण येत नाही. ज्या पदापर्यंत जाण्याची इच्छा आहे ती पूर्ण होते. यासाठी ध्येय ठरवणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याकरिता परिश्रम घेण्याची गरज असते. युपीएससी किंवा एमपीएससी होताना शिक्षणामधील सर्व गुण अंगीकारण्याकरिता मार्गदर्शन घेण्याची नितांत आवश्‍यकता आहे. याकरिता खासगी क्‍लासेस्‌ची व्यवस्था पुणे, नागपूर शहरात आहे. परिस्थिती सर्वसामान्य असली तरी शिक्षण घेता येते. त्याकरिता श्रीमंत असले पाहिजे हा समज चुकीचा आहे. आजचे सर्वोत्तम शिक्षण हे सर्वसामान्य जनतेच्या मुलांना मिळावे यासाठी विविध योजना आहेत. स्पर्धा परीक्षा सोप्या असतात. यासाठी इंग्रजी व स्थानिक भाषा निवडणे महत्त्वाचे असते. प्रश्‍नांची उत्तरे सोप्या भाषेत लिहिली तरच चांगले मार्क मिळतात. आज महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन अधिकारी होतात ही समाधानाची बाब आहे. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास न डगमगता आपण त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे.

विंग कमांडर प्रमोद कालिया यांनी आपले सैन्यातील अनुभव सांगितले. प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी महाविद्यालयात राबवलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)