सर्वसामान्य मेटाकुटीला : पेट्रोलचे भाव 86.15 रुपयांवर

पुणे – महागाईने वैतागलेल्या मध्यवर्गीयांच्या चिंतेत आणखी भर पडली असून रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. शहरात पेट्रोलचे भाव 86.15 तर डिझेलची किंमत 74 रुपये इतकी झाली आहे. “ही दरवाढ अभूतपूर्व असून स्वातंत्र्यानंतरची सर्वांत उच्चांकी आहे,’ असे ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारूवाला यांनी सांगितले.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इंधनाच्या दरांवर होत असून, त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून सागितले जात आहे. शहरात गेल्या महिन्यात पेट्रोलचे भाव 85 रुपयांपर्यंत वाढले, तर डिझेलचे दर 70.27पासून 71.41 रुपये इतके वाढले होते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पेट्रोलचे दर 1.15 रूपयांनी वाढून 86.15 इतके झाले, तर डिझेलची किमत 3 रुपयांनी वाढून 74 रुपये झाली आहे. एकूणच इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

याबाबत दारूवाला म्हणाले, “भारतात 80 टक्के इंधन हे परदेशांकडून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम आपल्याकडील इंधनांच्या किंमतींवर होतो. आगामी काळातदेखील या किंमती वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.’

 

दररोज लागणारे इंधन


27 लाख लिटर
जिल्ह्यात पेट्रोलची मागणी


46 लाख लिटर
जिल्ह्यातील डिझेलची मागणी

मागणीत पाच टक्‍क्‍यांनी वाढ :
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत तब्बल पाच टक्‍यांनी वाढ झाली आहे. ही वाढ औद्योगिक क्षेत्रातील नसून रहिवासी क्षेत्रामध्ये म्हणजेच नागरी वाहतुकीमधील वाढ आहे. खाजगी वाहनांचे वाढते प्रमाण हे यामागील महत्त्वपूर्ण कारण असल्याचे अली दारूवाला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)