सर्वसामान्यांच्या अन्नात सरकारने कालवली माती

राजगुरूनगर- देशात महामागाईचा प्रश्‍न मोठा आहे. महागाई कमी करा, अशी मागणी गांधीगीरीच्या मार्गाने आंदोलन करून करीत आहोत. शांततेच्या मार्गाने निवेदन देत आहोत. मात्र यापुढे सर्वसामान्य माणूस शांत बसणार नाही. जनता पेटून उठली आहे. गोरगरिबांच्या अन्नात माती कालवण्याचे काम भाजप सरकार करीत आहेत. तुमच्या या हुकुमशाहीला सर्वसामान्य नागरिक कंटाळला आहे. हुकुमशाहीमुळे देशातील जनता होरपळली आहे. सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहिला नाही, असा घणाघात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी भाजप सरकावर केला आहे.
पेट्रोल-डीझेल-गॅसची झालेली प्रचंड भाववाढ कमी करावी या मागणीसाठी व भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्‍यातील भाजप शिवसेना वगळता सर्व पक्षीय मोर्चा येथील खेड तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला, त्यावेळी झालेला सभेत माजी आमदार दिलीप मोहिते बोलत होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भीमशक्‍ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डी. डी. भोसले, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर तुळवे, तालुका उपाध्यक्ष सुभाष गाढवे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास सांडभोर, युवकाध्यक्ष कैलास लिंभोरे, महिला अध्यक्षा दिपाली काळे, निर्मला पानसरे, अरुण चांभारे, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, भीमशक्‍ती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान भाजप-शिवसेना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 • समविचारी विरोधी पक्षांचा मोर्चा
  राजगुरुनगर येथे भारत बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळपासून व्यवहार सुरू होते मात्र, सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतर मोर्चा मार्गातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. कोणताही अनुचित प्रकार तालुक्‍यात घडला नाही. भारत बंद निमित्ताने निघालेल्या मोर्चात समविचारी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. तसेच विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना देण्यात आले.
 • उद्धव ठाकरे शेळी झाले?
  वाघासारखे डरकाळी फोडणारे उद्धव ठाकरे शेळी का झाले. अमितशाह ने डोस दिला की काय हेही कळत नाही. भ्रष्टाचारात शिवसेना आहे का? कदाचित त्यात त्यांचे हात गुंतले असतील म्हणून उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडत नाहीत. पोकळ डरकाळ्या फोडण्यापेक्षा आजच्या महागाई विरोधातील भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी झाली असती तर भारतातील जनतेने स्वागत केले असते. जनतेने पाठ थोपटली असती, असे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नमूद केले.
 • कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेत असताना समाजहिताचे काम केले आहे. जनतेच्या प्रश्‍नासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तालुक्‍यातील आमदार-खासदार हे निष्क्रिय बनले आहेत. 15 वर्षांत खासदारांनी केवळ एक पूल बांधला. घरगुती गॅस वाढ, डीझेल पेट्रोल दर वाढ दिवसागणिक वाढत आहे. ही दरवाढ वेळीच थांबली नाही तर कॉंग्रेस, भीमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.
  – विजय डोळस, अध्यक्ष, भीमशक्‍ती संघटना
 • देशात हिटलरशाही आली आहे. पहिली नोटबंदी केली मग जीएसटी आणले. त्यानंतर जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढले. एवढेच नाही तर आता डीझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅस दर वाढवले आहेत. भाजप सरकार जानेतेवर अन्याय करीत चालले आहेत म्हणून आता सर्वांनी एकजुटीने त्यांना पदावरून खाली खेचले पाहिजे. शेतकरी जनता या भाववाढीला कंटाळले आहे. जनतेने जागृत होवून सर्वांनी अशा आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.
  – समीर थिगळे, पुणे जिल्हा अध्यक्ष, मनसे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)