सर्वसामान्यांची लूट, वाहतूकदारांना सूट

ऐन दिवाळीत ट्रॅफिक जॅम करणाऱ्या लक्‍झरी बसेसवर कारवाईस बगल 


सर्वसामान्यांवर पीएमसी अॅक्‍टनुसार कारवाई

– गणेश राख

पुणे – वाहतुकीला शिस्त लागावी, या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी शहरातील बेशिस्तांवर पीएमसी अॅक्‍टनुसार कारवाईला सुरुवात केली. यामुळे ऐन दिवाळीत बाहेरगावी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना एका चुकीमुळे हजारो रुपयांचा दंड भरावा लागत आहे. मात्र, याचवेळी शहरातील कोंडी वाढण्यास कारणीभूत असणाऱ्या लक्‍झरी बसेसवर वाहतूक पोलीस मेहेरबान असल्याचे दिसत आहे. नव्या निर्णयानुसार लक्‍झरी चालकांना शहरात पीक अव्हर्समध्ये पूर्णतः बंदी आहे. मात्र, त्यांच्यावरील कारवाई दिवाळीनंतर (दि.15) सुुरु केली जाणार असल्याने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांची लूट आणि वाहतूकदारांना सूट दिली जात असल्याचे चित्र शहरात आहे, यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वतीने संयुक्‍त मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी पंचसुत्री धोरण राबवण्यात आले असून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. नुकतेच, वाहतूक पोलिसांकडून “नो पार्किंग’, फुटपाथवरील वाहनांवर महापालिका अॅक्‍टनुसार कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे दुचाकीला पाच तर चारचाकींसाठी तब्बल दहापटीने दंड वाढ झाली आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत शहरातील विविध भागात पुरेशी पार्किंगची सोय उपलब्ध नाही. अशावेळी नागरिकांना वाहने लावण्यासाठी जागा मिळत नसून इतरत्र वाहने लावल्यास तब्बल हजार, दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडण्यास विचार करू लागला आहे. मात्र, याचवेळी लक्‍झरी बसेसला कारवाईत सूट देण्यात आली आहे. या बसेसमुळे शहरातील कोंडीत मोठी भर पडत असल्याचा निष्कर्षही वाहतूक पोलिसांचाच आहे. यामुळे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत त्यांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली होती. नुकतेच या निर्णयात बदल करण्यात आला आहे. विशिष्ट मार्गांवर प्रवेशाला मुभा देण्यात आली आहे. पीक अव्हर्समध्ये लक्‍झरी बसेसना पूर्णतः बंदी आहे. मात्र, वाहतूक पोलिसांकडून या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर करण्यात येणार आहे. दिवाळीत लक्‍झरी चालकांचा खरा त्रास असून याच कालावधीत त्यांच्याकडून प्रवाशांची ने-आण वाढते. अशावेळी त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याने वाहतूक कोंडीत भरच पडणार आहे.

दिवाळीनंतर पीएमपी अॅक्‍टनुसार कारवाई करावी
दिवाळीनिमित्त शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पीएमपी अॅक्‍टनुसार नो पार्किंग, फुटपाथवर वाहने लावणे महाग पडणार आहे. दुचाकीसाठी एक तर चारचाकींसाठी 2 हजार रुपये दंड लावण्यात येत आहे. मात्र, शहरातील मध्यवर्ती भागासह प्रमुख ठिकाणी पार्किंगची पुरेशी सोय उपलब्ध नाही. यामुळे गाडी इतरत्र लावून खरेदी केली जाते. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे लागणारा दंड तुलनेने जास्त असल्याने नागरिक वैतागले आहेत. यामुळे दिवाळीनंतर पीएमसी ऍक्‍टची कारवाई सुरु करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

असा आहे नवा नियम
लक्‍झरी बसेसना शहरात दिवसा विशिष्ट मार्गावर प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी थांबे निश्‍चित करण्यात आले असून कुठल्या थांब्यावर किती वेळ थांबायचे हे देखील ठरवण्यात आले आहे. मात्र, सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 9 या पीक अव्हर्समध्ये ठरवण्यात आलेल्या मार्गासह इतर कुठल्याही मार्गावरून शहरात लक्‍झरी बसेसना बंदी घालण्यात आली आहे.

लक्‍झरी बसेसना शहरात येण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. पीक अव्हर्समध्ये त्यांना पूर्णतः बंदी असून दि. 15 नोव्हेंबरनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अनेक नागरिकांकडून आगाऊ बुकिंग करण्यात आले आहे. यामुळे सद्यस्थितीत नियम लागू केल्यास अशा नागरिकांची गैरसोय होईल. या हेतून नियमाची अंमलबजावणी दि. 15 नोव्हेंबरपासून केली जाणार आहे.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)