सर्वपक्षीय नेत्यांच्या गप्पांचा रंगला फड

पिंपरी – राजकीय मतभेद विसरून पिंपरी-चिंचवड शहरातील दिग्गज नेते रविवारी एकत्र आले. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळी फराळ उपक्रमाचे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जवळपास अडीच तास गप्पांची मैफिल रंगली, हास्यविनोद करताना एकमेकांची फिरकी घेण्याची संधी यावेळी कोणीच सोडली नाही.

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाटचालीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे, त्यांच्यात दिलखुलास संवाद घडावा. या हेतूने दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आकुर्डी प्राधिकरणातील केरळ भवन येथे सलग दुसऱ्या वर्षी रविवारी (दि. 4) हा उपक्रम घेण्यात आला. महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, संजय उर्फ बाळा भेगडे, माजी खासदार गजानन बाबर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, सिनेअभिनेते भरत जाधव, नाट्य निर्माते राहुल भंडारे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहर प्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक राजू मिसाळ, नाना काटे, शत्रुघ्न काटे, अमित गावडे आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर स्वतःच्या पक्षांची ध्येयधोरणे मांडत असतोच. वेळप्रसंगी आपल्यात राजकीय जुगलबंदी, तसेच आरोप-प्रत्यारोपही होत असतात. आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणे, सामाजिक बांधिलकी जपत लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद घडवण्याचे काम दिशाच्या या उपक्रमातून होत आहे. या सुसंवादाचा उपयोग शहराच्या विकासासाठी आणि विधायक वाटचालीसाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले. भाऊसाहेब भोईर म्हणाले की, आपल्या शहराला सांस्कृतिक परंपरा आहे. दिवाळी फराळ ही विचारांची मेजवानी सर्वांना ऊर्जा देणारी आहे. दिशाच्या व्यासपीठावर राजकीय जोडे बाजूला ठेवून, नेहमीच्या व्यस्त कामातून वेळ काढत दिलखुलास आणि निखळ गप्पांची मैफल यानिमित्ताने जमून आली. दिशाचा हा उपक्रम अखंडितपणे सुरूच रहावा अशी अपेक्षा भोईर यांच्यासह उपस्थित नेत्यांनीही व्यक्त केली.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. आभार कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)