हिंदु कॉंग्रेस अधिवेशनात राजा कृष्णमुर्ती यांचे प्रतिपादन
शिकागो – सहिष्णुता, प्रेम, विविधता आणि सर्वसमावेशकता ही हिंदु धर्माची वैशिष्ट्ये आहेत. सर्वच धर्मांना आपलेसे करणारी विचारसरणी हिंदुत्वात सामावलेली आहे असे प्रतिपादन भारतीय अमेरिकन कॉंग्रेसमन राजा कृष्णमुर्ती यांनी केले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड हिंदु कॉंग्रेस मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की हिंदुत्वाचे हे मुलभूत विचार पुढील सर्वच पिढ्यांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न हिंदुंनी केला पाहिजे.

जगभरातील सर्वच हिंदुंनी हिंदुत्वाची ही उच्च विचारसरणी जपली पाहिजे आणि सहिष्णुता, प्रेम व सर्वसमावेशकता या मुल्यांची प्रकर्षाने जपणूक केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जगातल्या कोणत्याही व्यक्तीला मग तो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही देशाचा असो त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न आपण करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. आपण हिंदुत्वाची ही मुल्य मानतो म्हणूनच आपल्या मतदार संघातील अनेकांनी विरोध करूनही आपण या अधिवेशनाला आर्वजून उपस्थित राहिलो असे ते म्हणाले.

सर्वसमावेशकतेची हिंदुत्वाची उच्चविचारसरणीच आपल्याला मान्य आहे अन्य कोणत्याही प्रकारच्या हिंदुत्व विचारांना आपला विरोधच आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे पाईक आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 ला शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत केलेल्या भाषणाचा पुढे अनेक पिढ्यांवर प्रभाव राहिला.

त्यातूनच मार्टिन ल्यूथर किंग आणि महात्मा गांधी यांच्या सारखे मानवतावादी नेते पुढे आले सर्वच वर्ण, व वंशांना समान लेखणाऱ्या या विचारांचा लक्षावधी अमेरिकन नागरीकांवरही प्रचंड प्रभाव पडल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. कोणत्याही धार्मिक भेदभावाच्या विचारसरणीला एक हिंदु म्हणून आपला विरोधच असेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)