सर्वच कार्यालयात “मार्च एन्ड’ची लगबग

पिंपरी – “मार्च एन्ड’मुळे सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयांमध्ये वर्षभराच्या कामाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक कार्यालये सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

“मार्च एन्ड’मुळे बॅंकांचे काम आता वाढले आहे. त्यातच महावीर जयंती, गुड फ्राय डे आणि हनुमान जयंती यांसारख्या शासकीय सुट्टया आल्याने कामाचा ताण आणखी जाणवत आहे. बॅंकांचा वर्षभराचा कामाचे टॅली करावयाचे असल्याने सर्व प्रकारच्या उलाढालींची माहिती घेत, 31 मार्चच्या आत तयार करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे. पतसंस्था व सहकारी बॅंकांमध्ये देखील हेच दृश्‍य पहायला मिळत आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये देखील हिच परिस्थिती पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागात विकास कामांची बीले सादर करण्यासाठी 23 मार्च शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे ही बीले सादर करण्यासाठी ठेकेदारांची एकच धावपळ उडाली होती. याशिवाय ठरविलेले उद्दीष्ट गाठण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने मार्च महिन्यात कराचा रोख भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना एकूण मिळकत करात सुट दिली जात आहे. याशिवाय सुट्टीच्या दिवशी देखील कराचा भरणा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील कर संकलन कार्यालय खुले असणार आहे.

वाहनांकडे दंडाची रक्कम भरणे बाकी आहे की नाही याची वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून सिग्नलवर पडताळणी केली जात आहे. याशिवाय वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, केवळ “मार्च एन्ड’मुळे ही कारवाई अधिक तीव्र केल्याचा आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे.

8,520 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत
महावितरण कंपनीची वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. अधिकाऱ्यांनी देखील वसुलीवर भर दिला आहे. याशिवाय थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. गेल्या पंधरवड्यात पुणे शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 28 हजार 620 थकबाकीदारांचा वीज पुरवठा 8 कोटी 13 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला. भोसरी व पिंपरी विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील 8 हजार 520 वीज ग्राहकांकडे 5 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्‍यातील 7 हजार 939 थकबाकीदारांचा वीज पुरवठा 5 कोटी 34 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)