सर्पोद्यानचा “मेक ओव्हर’

– सरपटणाऱ्या प्राण्यांचे राज्यातील पहिले संग्रहालय ठरणार
– ऍनाकोंडा, किंग कोब्रा, दुर्मिळ पाणथळ पक्षी अन्‌ बरेच काही!

पिंपरी – निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम 60 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. प्राणी संग्रहालयाचे स्वरूप बदलून सरपटणाऱ्या प्राण्यांचे राज्यातील पहिले, तर देशातील हे चौथे संग्रहालय ठरणार आहे. पाणथळ पक्ष्यांमध्ये जगातील सर्वात उंच उडणारा सारस क्रौंच, ऍनाकोंडा, किंग कोब्रा व अनेक जैव वैविध्य या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. उद्यानाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

महापालिकेने 1989 मध्ये चिंचवडच्या संभाजीनगर येथे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी उद्यान विकसित केले. 1 जानेवारी 1990 ला उद्यान नागरिकांसाठी खुले केले. सर्पकुंडांमुळे सर्पोद्यान असेही या उद्यानाला संबोधले जाते. सुमारे नऊ एकर परिसरातील या उद्यानात चारशे चौरस मीटर हिरवळ, 463 झाडे, 66 सरपटणारे, 12 सस्तन प्राणी व 68 पक्षी, तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी ठेवली होती. विविध प्राणी पाहण्यासाठी दरवर्षी शालेय विद्यार्थी व पर्यटक प्राणी संग्रहालयाला भेट देतात. इतर पशू-पक्ष्यांबरोबरच बिबटे पर्यटकांचे आकर्षण बनले होते. एकूण सहा बिबटे या प्राणी संग्रहालयात आहेत.

महापालिकेने प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेतला. बृहत्‌‌‌ विकास आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करुन केंद्र सरकारच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला. संग्रहालय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी बहिणाबाई उद्यानाची पाहणी केली. त्यांनी निरीक्षणे नोंदवल्यानंतर सस्तन प्राण्यांना येथून हलवण्याचा निर्णय घेतला. हे उद्यान सर्पालय व पक्षालय म्हणून विकसित करण्याची त्यांनी परवानगी दिली. बिबटे, माकड आदी प्राणी अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले. बृहत्‌ विकास आराखड्यानुसार संग्रहालयाचे काम सुरू असून 60 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उद्यानाच्या कामात बाधीत झाडांचे याच ठिकाणी पुन: रोपण करण्यात आले आहे. उद्यानातील बांधकामांसाठी 14 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

आराखड्यानुसार सरपटणारे प्राणी, पक्ष्यांसाठी या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या उपचारासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. तसेच महापालिकेच्या अन्य दोन पशू वैद्यकीय रुग्णालयांवरील भार कमी होणार आहे. या ठिकाणी 18 गुंठे जागेत स्वतंत्र कासवालय तयार करण्यात येणार असून जमीन व पाण्यावरील कासवांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. 13 ते 14 प्रकारची कासवे येथे पाहायला मिळतील. पूर्वी प्राणी संग्रहालयात मगर होती. आता मगरीसह सुसर देखील या ठिकाणी असेल. 12 प्रकारचे पाणथळ पक्ष्यांमध्ये जगात सर्वात उंच उडणारा सारस क्रौंच, बदक, बगळे, हंस आदी पक्षी पहायला मिळणार आहेत. ऍनाकोंडा, किंग कोब्रा सर्पालयाचे आकर्षण असेल. अन्य 15 प्रकारचे सर्पही या ठिकाणी असतील. विशेष म्हणजे साप पाहण्यासाठी गुहा तयार करण्यात येणार आहे. दोन प्रकारच्या घोरपडी, 12 प्रकारचे सरडे पाहायला मिळणार आहेत.

संग्रहालयाची वैशिष्ट्ये
– ऍनाकोंडा, किंग कोब्रासह 15 प्रकारचे साप.
– दक्षिण अमेरिकेतील ग्रीन इग्वाना सरडा.
– सर्वात उंच उडणारा पाणथळ पक्षी सारस क्रौंच.
– 18 गुंठे जागेत कासवालय.
– सर्प पाहण्यासाठी गुहा.
– 12 प्रकारचे पाणथळ पक्षी.
– वन्यजीव ग्रंथालय.
– वन्यजीव माहिती केंद्र.

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची बृहत्‌‌‌ विकास आराखड्याला परवानगी मिळताच संग्रहालयाचे काम सुरू करण्यात आले. संग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार अपेक्षित बदल करण्यात आले. जून अखेर संग्रहालयातील बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर इतर कामे होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमधील प्रजातीचे सर्प, पक्षी ठेवण्यात येणार असून त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करून तेथील मिळते-जुळते वातावरण तयार करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत संग्रहालय खुले करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
– दीपक सावंत, अभिरक्षक, बहिणाबाई प्राणी संग्रहालय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)