सर्जिकल स्ट्राईक मोहिमांसाठी तयार राहण्याची गरज

संरक्षण विषयक अभ्यासक मारुफ रझा यांचे मत

पुणे- पाकिस्तानला बहुतांश नद्या भारतीय भूमीवरून वाहतात. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध दबाव तंत्र म्हणून या नद्यांच्या पाण्याचा विचार करणे भारताला शक्‍य आहे, असे मत संरक्षण विषयक अभ्यासक मारुफ रझा यांनी व्यक्‍त केले. तसेच भारताने भविष्यात सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोहिमांसाठी तयार राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्‍युरिटी ऍन्ड डिफेन्स ऍनालिसिस यांच्यातर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. “भारत-पाकिस्तान संबंधामधील भूसामरिक परिस्थिती’ हा व्याख्यानाचा विषय होता. लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.

मारुफ रझा म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारण्यासाठी अनेक चर्चा घडवून आणण्यात आल्या, मात्र कोणत्याही चर्चेबाबत पाकिस्तान गंभीर नाही. हाफीज सईद सारख्या कुख्यात दहशतवाद्यांवर भारत मोठी बक्षिसे का लावत नाही, असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही एकट्या बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंजच्या निम्मी असल्याने या दोन्ही देशांची कोणत्याही बाबतीत तुलना शक्‍य नाही.’

डॉ. करमळकर म्हणाले, भूरचना शास्त्राचा अभ्यासक म्हणून 1982 पासून अनेकदा नियमित कारगिल परिसरात जाणे होत असे. पुढे अनेक वर्षांनी युद्धामुळे कारगिलचे नाव सर्वांना परिचित झाले, मात्र भूरचना शास्त्राच्या दृष्टीने ही तो परिसर समृद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विजय खरे यांनी प्रास्ताविक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)