सर्जापूर , कळंभे उडतारेत बेसुमार वाळू उपसा

मयूर सोनावणे

विरमाडे – महामार्गाला लागून असलेल्या उडतारे तसेच तिथून पूर्वेला असलेल्या कळंभे आणि सर्जापूर या गावांमध्ये कुडाळी नदीपात्रात स्थानिक तसेच बाहेरील काही वाळूमाफियांनी चांगलाच हैदोस घातला आहे. सध्या या तीनही गावांच्या हद्दीत रात्री तसेच पहाटेच्यावेळी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे. मात्र, यावर कारवाई होत नसल्याने महसूल विभागाची या वाळू उपशांवर नजर पडली नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.महसूल विभागाची हाताची घडी अन्‌ तोंडावर बोट अशीच भूमिका आहे.

जावली तालुक्‍यातून वाहत येणारी कुडाळी नदी ही जावली तालुक्‍यातील सर्जापूर आणि वाई तालुक्‍यातील कळंभे, उडतारे या गावांच्या हद्दीतून वाहत असून खडकी येथे कृष्णानदीला मिळते. सध्या कुडाळीनदी पात्रा सर्जापूर, कळंभे अन्‌ उडतारे या गावांच्या हद्दीत काही वाळू माफियांनी बेसुमार वाळू उपसा सुरु केला आहे. परंतु, या ठिकाणी होत असलेल्या वाळू उपशावर आजतागायत एकदाही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या सुरु असलेल्या बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात अनेकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यापुढेही अशाच प्रकारे वाळू उपसा सुरु राहिल्यास भविष्यात नदीपात्रच बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मात्र, या सर्व बाबी प्रशासनाने नजरेआड केल्याने नेमकी दाद तरी मागायची कुणाकडे? असा प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे.

महसूूलच्या कारभारावर संशयाची सुई

गेल्या अनेक वर्षांपासून उडतारे, सर्जापूर आणि कळंभे या गावांच्या हद्दीत कुडाळी नदीपात्रा अनधिकृत वाळू उपसा सुरु आहे. मात्र, या अनधिकृत उपशांवर आजवर एकदाही कारवाई झाली आहे, असे ऐकिवात नाही. विशेष म्हणजे या पैकी दोन गावांसाठी एकच तलाठी आहे. या तलाठ्यालाही या उपशाबाबत माहिती नाही की? माहिती असूनही संबंधिताकडून “मुग गिळून गप्प’ बसण्याची भूमिका बजावली जात आहे. दरम्यान, वाळू ठेकेदार आणि महसूल विभाग यांच्यात आर्थिक तडजोडीची शक्‍यता वर्तविली जात असून तशी कुजबुजही ग्रामस्थांमधून सुरु आहे. दरम्यान, सध्या नुकताच या गावांसाठी नवीन तलाठी नेमण्यात आला असून हे तलाठी महाशयतरी या वाळू उपशाकडे लक्ष देणार का? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

प्रांताधिकारी कारवाईचे पाऊल उचलणार का?

गेल्या अनेक वर्षांपासून कुडाळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. कुडाळीतील वाळूच्या जीवावर स्थानिकांसह इतरही वाळू ठेकेदार चांगलेच “गब्बर’ झाले आहेत. आजवर या ठेकेदारांवर कारवाई झाली नसल्याने दिवसेंदिवस त्यांचे धाडस वाढले आहे. परंतु, सध्या वाई तालुक्‍याचा नव्याने कारभार हाती घेतलेल्या प्रांताधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून वाळू माफियांवर कडक कारवाई करुन दणका दिला आहे. परंतु, कुडाळीतील वाळू उपसा अद्याप त्यांच्या नजरेस पडलेला नसल्यामुळे आता तरी कारवाई करणार का? हे आगामी काळातच ठरेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)