सरासरीच्या 92 टक्के पाऊसमान

शेतकऱ्यांची चिंता वाढली : स्कायमेटने वर्तवला सुधारित अंदाज
नवी दिल्ली – हवामानाचा अंदाज वर्तवणारी “स्कायमेट’ने सरासरीपेक्षा मान्सून कमी होण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे. सरासरीच्या 92 टक्के पाऊसमानाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे.

स्कायमेटने जारी केलेल्या सुधारीत अहवालानुसार, आतापर्यंत संपूर्ण देशात सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यात पडणा-या मान्सूनचा प्रभाव कमी असण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच यावर्षी एकूण 92 टक्के पावसाचा सुधारित अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. याआधी 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता.

स्कायमेटनुसार उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये यावर्षी मान्सूनचा प्रभाव कमी आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने ऑगस्ट महिन्यात 88 टक्के पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात 96 टक्के पावसाचा सुधारित अंदाज स्कायमेटने वर्तवला होता.

सप्टेंबर महिन्यात 93 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये सरासरी 101 टक्के अंदाज वर्तवला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होण्याची शक्‍यता 60 टक्के आहे. तर पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता 20 टक्के आहे.

हवामान विभागानुसार, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत बिहारमध्ये 23 टक्के, झारखंडमध्ये 24 टक्के, अरुणाचल प्रदेशमध्ये 37 टक्के, आसाममध्ये 27 टक्के, मेघालयमध्ये 43 टक्के आणि मणिपूरमध्ये 64 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)