सराईत गुन्हेगार श्रीकांत जाधव यांच्या आवळल्या मुसक्‍या

पुणे – सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंढवा पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार श्रीकांत उर्फ शिरक्‍या राजु जाधव (20, रा.स.नं. 94, सर्वोदय कॉलनी, मुंढवा) याच्यावर एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई केली आहे. शिरक्‍या याच्या विरोधात मुंढवा आणि अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

जाधव याच्या विरोधात खूनाचा प्रयत्न करणे, शस्त्रांचा धाक दाखवून रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटणे, घरफोडी आणि चोरी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्याला शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली असतानाही जाधव याने तडीपारी आदेशाचा भंग करून त्याने वाळूची तस्करी तसेच अन्य गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. त्याच्या या गुन्ह्याची दखल घेऊन त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलिसांनी तयार केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक गवळी, पोळ, सहायक पोलीस फौजदार भोसले, पोलीस कर्मचारी चव्हाण आणि शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)