पुणे : सराईताकडून 18 मोटारसायकल जप्त

सहा ते आठ हजारात करायचा विक्री

प्रभात वृत्तसेवा
पुणे – संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने (उत्तर प्रादेशिक) एका सराईत गुन्हेगाराकडून चोरीच्या 18 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याने या दुचाकी यवत परिसरात अवघ्या सहा ते आठ हजारात विकल्या होत्या. या गुन्ह्यातील त्याचा साथीदार मात्र फरार आहे.

सोहेल सुनील नानावत (23, रा.यवत, ता.दौंण्ड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर मुख्य आरोपी लखन उर्फ अमोल विलास देशमुख (रा.पंदरे, काकरे वस्ती, ता. बारामती) हा फरार झाला आहे.
संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाला सोहेल हा चोरीची मोटरसायकल घेऊन मित्रास भेटायला येण्याची खबर मिळाली होती. त्यानूसार अंडी उबवणी केंद्राजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मोटरसायकलीं संदर्भात चौकशी केली असता, त्याने ती चोरीची असल्याचे कबूल केले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने लखन हा मोटरसायकल चोरीतील मुख्य सुत्रधार असल्याचे सांगितले. लखनने चोरलेल्या मोटरसायकली आपण यवत येथील कंजारभट वस्तीतील नागरिकांना विकायचे काम करत असल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी विकलेल्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या दोघांनी वानवडी, हडपसर, लोणी काळभोर, चाकण, शिक्रापूर, जेजुरी, वडगाव निंबाळकर, लोणीकंद, फलटण, अकलूज या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी 15 गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या चोरीच्या मोटारसायकलींची किंमत 5 लाख 56 हजार इतकी आहे. यातील लखन हा बारामती व यवत पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, अपहरण, चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक पी.डी.गायकवाड व कर्मचारी दिपक भुजबळ, राज देशमुख, रमेश भिसे, प्रदीप शेलार, गाडे, अतुल मेंगे, विठ्ठल बंडगर, हजरत पठाण, पांडुळे, सोनवणे, राजु मोरे, दत्ता फुलसुंदर, नवनाथ चांदणे, दिनेश साबळे, कांतीलाल बनसुडे व शितल शिंदे यांनी केली.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)