सरस्वतीच्या मंदिरात पुजार्‍यांची मुजोरी?

वाचक, कर्मचारी, संचालकांना एकत्र आणण्याचे अध्यक्षांपुढे आव्हान
सातारा, (प्रतिनिधी) – येथील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाची 165 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेपूर्वी रंगलेले अध्यक्ष बदलाचे नाट्य ज्येष्ठ संचालकांनी भावनिक दबाव तंत्राच्या जोरावर थांबवले. अध्यक्ष पदासाठी इच्छूक व्यक्तीला त्याच्या घरी जाऊन नाट्यमय रित्या त्या व्यक्तीला थांबवणे हा प्रकार गंभीर तितचकाच लोकशाहीच्या मुलभूत तत्वांना हरताळ फासणारा आहे.याचा दुसरा अर्थ नगर वाचनालय आपली जहागिरी असून त्यावर हम करे सो कायद्याचीच अंमलबजावणी होत रहाणार असा आहे.सहाजिकच वाचनालयाचे फेर निवड झालेले अध्यक्ष युवराज पवार आणि उपाध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या पुढे वाचक, संचालक आणि कर्मचारी यांच्या त्रिवेणी संगमातून वाचनालयाला नव्या आयाम कसा देता येईल आणि वाचनालय सभासद तसेच आर्थिकदृष्ट्या कसे संपन्न करता येईल हे आव्हान आहे.
हे वाचनालय हे श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थो.) यांच्या संचिताची पुण्याई आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा अनमोल ठेवा आहे. तसेच केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अत्यंत मौल्यवान वाचनालय आहे. येथे विधायक विचारांची किमान पातळी असणारी मंडळी येतात याचे भान राखणे आवश्यक आहे. त्यामूळे वाचनालयाची शान वाढण्यासाठी, सुधारणांसाठी एकत्रित, विधायक प्रयत्न आवश्यक आहेत. हे वाचनालय नव्या पिढीशी, युगाशी जोडणे आवश्यक आहे. संचालकांचे सरासरी वय काढले तर ते किमान पच्चावन्न वर्षांच्या पुढे भरेल.सहाजिकच ज्येष्ठ नागरिकांचा संघ चालवल्यासारखे हे वाचनालय चालवले जाते.नव्या पिढीला वाचनालयाकडे यावे असे वातावरण तयार करण्यात संचालक मंडळ कमी पडत आहेत का? याचा विचार आता केला पाहिजे. पुढच्या पिढीत पुस्तक वाचणारा वाचक तयार करायचा असेल तर विद्यार्थी दशेतच त्याला वाचनाची आवड लावली पाहिजे. वाचन, लेखनाचे उपक्रम आयोजि केले पाहिजेत. वाचक, विद्यार्थी वाचनालयाकडे येत नसेल तर वाचनालयाने विद्यार्थ्यांपर्यंत, वाचकांपर्यंत पोचले पाहिजे. साखळी योजना किंवा सुट्टीत लहान मुलांसाठी दोन महिने चालणार्‍या एखाद्या उपक्रमावर कृतकृत्य झाल्याचे समजता कामा नये. वाचनालय जुने आहे. या वर्षिच्या ताळेबंदात वाचनालयाला देणगी दाखल एक रुपया मिळाला नाही असे दिसते. ही परिस्थीती चिंताजनक तर आहेच पण संचालकांनी त्याच बरोबर वाचकांनी ही गांभीर्याने घेतली पाहिजे. आपापसातल्या कुरघोड्या सोडून आणि वाचनालय म्हणजे वेळ घालवण्याचा अड्डा न करता वाचक कसे वाढतील या कडे लक्ष दिले पाहिजे.वाचकांची वाचण्यासाठी योग्य व्यवस्था करणे, उत्पन्नाची साधने वाढवणे, कर्मचारी वर्गाच्या क्षमतांचा योग्य उपयोग करून घेणे या बाबत ही योग्य ती भूमिका घेत त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. पक्ष आणि राजकीय विचारांचे जोडे सरस्वतीच्या या मंदिराबाहेर ठेवले आणि मोकळेपणानी संवाद साधला तर अनेक मंडळी या संस्थेच्या मदतीस तयार आहेत. मात्र पूर्वग्रह दुषित विचार आणि माझे ते खरे या आडमुठ्या, हेकट वृत्तीने तसे होत नाही. आपल्याला अपेक्षित अध्यक्ष होणार नसेल तर होणार्‍या अध्यक्षाला सहा महिने सहकार्य न करता त्यावर अविश्वासाचा ठराव संचालक मंडळाव्दारे आणायचा आणि काम करु इच्छीणार्‍या नव्या उमेदीच्या व्यक्तीचे खच्चीकरण करायचे हा प्रकार तर अनाकलनीय. कोत्या मनोवृत्तीचा. हा प्रकार राजकीय डावपेचांच्या सहकारी संस्थात हयात घालवलेल्या विचारसरणीची आहे. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक अशा प्रकारच्या डावपेचातून, वाचनालयात आम्ही लोकशाही जिवंत ठेवतो असे म्हणत असतील तर त्यांच्या विचारसरणीला दंडवतच घातला पाहिजे. एखाद्या संस्थेत अनेक वर्षे काम केले तर त्या संस्थेशी भावनिक संबंध, आपुलकी निर्माण होते. मात्र, त्यावर मालकी हक्क निर्माण होत नाही याची जाणीव संचालकांनी ठेवली पाहिजे. वाचनालयात वेगवेगळ्या विचारसरणीची पुस्तके असतात मग संस्थेच्या भल्याचा विचार करणारी पण वेगवेगळ्या विचारसरणीची मंडळी वाचनालयाच्या संचालकांमध्ये का नसावी असा ही प्रश्न निर्माण होतो.वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पोटतिडकीने बोलणारी मंडळी कोणा व्यक्तीच्या विरोधात नक्कीच नसतात तर वाचन संस्कृतीच्या बाजूने असतात.जिल्ह्यात वाचन संस्कृती वाढवणारी ही संस्था नावारुपाला कशी येईल,आर्थिकदृष्ट्या कशी संपन्न होईल, बारा तास चालणारे वाचनालय, अद्ययावत सेवा पुरवणारे वाचनालय, वाचकांनी गजबजलेले वाचनालय, जिल्ह्यातील सर्व वाचनालयांची मातृसंस्था असणारे वाचनालय अशी ओळख निर्माण करण्यासाठी हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजेत. सकारात्मक विचार, विधायक उपक्रम, तेच ते चेहरे वगळून नव्या मंडळींना सहभागी करून केलेले कार्यक्रम, रचनात्मक आत्मचिंतनातून वाचनालय नक्की वाचकांच्या जीवनाचा हिस्सा होईल. अनेक महाविद्यालय, शाळा, साक्षरतेचे उत्तम प्रमाण असलेलेल्या सातार्‍यात केवळ दोन हजार वाचक सभासद असावेत ही लाजीरवाणी बाब संपवण्यासाठी खरेच 165 व्या वर्षा निमित्त झटून कामाला लागले पाहिजे. अन्यथा सरस्वीतीच्या या मंदिरात पुजारीच मुजोर झाल्याची परिस्थीती निर्माण व्हायची.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)