सरसकट शाळा बंदी करणे चुकीचेच

शरद पवार: मुख्याध्यापक सभेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता
पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जवळपास दीडशे शाळा विद्यार्थीसंख्येअभावी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सर्वत्र एकसारखी विद्यार्थीसंख्या कशी असेल असा प्रश्‍न उपस्थित करत सरसकट शाळा बंदीच्या सरकारचा शाळा बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे मत राष्ट्रवादी कॉग्रेंसचे अध्यक्ष व माजी केंद्रीयक मंत्री शरद पवार यांनी व्यक्‍त केले.
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला, त्यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमास पुण्याचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, पुणे विभागाचे प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, कार्याध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड, सचिव नंदकुमार सागर, विश्वस्त अरुण थोरात, हनुमंत कुबडे, शिवाजीराव किलकिले, अदिनाथ थोरात, भगवान शिंगाडे, मधुकर नाईक आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, एकीकडे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण मान्य केले आहे आणि दुसरीकडे पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद केल्या जात आहेत. पुणे, बारामती, कोल्हापूर, सातारा आदी शहरांमध्ये विद्यार्थीसंख्या कमी असेल तर त्या शाळा बंद केल्या तरी चालू शकतात. कारण त्या ठिकाणी पर्यायी शाळा उपलब्ध असतात. मात्र दुर्गम भागात ना पर्यायी शाळा असतात, ना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी तितक्‍या चांगल्या सुविधा असतात. आदिवासी पाड्यांवर लोकसंख्या कमी असते. त्यामुळे या ठिकाणी पटसंख्येचा निकष लावता येणार नाही. शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि पटसंख्येचा निकष या दोन्ही बाबी विरोधाभासाच्या असून त्या योग्य नाहीत. त्यामुळे त्यात बदल करावा लागेल. सध्या
ज्ञानदानाचे काम सोडून शिक्षकांवर शालाबाह्य कामांची जबाबदारी टाकली जात आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि विस्ताराचा विचार करता नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना मुक्तपणे काम करता आले पाहिजे. रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. भरती बंद करण्याचा निर्णय अतिरेकी असून नवी पिढी घडवण्याचा क्षेत्रातमध्ये खर्चावर काटकसर करणेही चुकीचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

शाळा बंदबाबत संयुक्‍त बैठक घ्यावी
शाळा बंद प्रकरणात मी राजकीय भूमिका घेणार नाही. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री आणि मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल. मी स्वत: या बैठकीस उपस्थित राहिल. त्यातून शिक्षणक्षेत्राचे, मुख्याध्यापकांचे व शिक्षकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल.

चहा पानावर एवढा खर्च होतो माहित नव्हते..
विधीमंडळातील चहा पानावर होत असलेल्या खर्चाचा उल्लेख करून शरद पवार म्हणाले, मी चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. आमच्या काळात अनेक चहापानाचे कार्यक्रम झाले. परंतु, चहापानावर एवढा खर्च होतो हे मला एवढे जाणवले नाही असे म्हणत त्यांनी सत्तादाऱ्यांना टोलाही मारला. दरम्यान प्रशासकीय खर्च करत तो पैसा नविन पिढीच्या भवितव्यासाठी वापरला पाहिले असेही पवार यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)