सरसकट एलईडी दिवे बसविण्यास लगाम

आयुक्तांच्या आदेशाने नगरसेवकांची कोंडी
पुणे : महापालिकेकडून शहरात बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा ( बीओटी) तत्वावर सुमारे 70 हजार एलईडी फिटिंग्ज बसविण्याचे काम सुरू आहे. असे असतानाच; महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतूदीचा वापर करून प्रभागांमध्ये नगरसेवकांकडून स्वतंत्र एलईडी बदलण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यावर खर्चही केला जात आहे. त्यामुळे एकाच कामासाठी पालिकेकडून दोन वेळा खर्च केला जात असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने या पुढे अंदाजपत्रकातील कोणत्याही तरतूदीमधून नवीन एलईडी बसविण्याचे काम केले जाऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना सर्व अभियंते आणि क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या असून परस्पर दिवे अथवा फिटींग्ज बदलण्यात आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
महापालिकेकडून शहरात स्काडा सिस्टम अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे बसविण्यात येत आहेत. त्या अंर्तगत सुमारे 70 हजार एलईडी फिटींग्ज बसविण्यात येणार आहे. हे काम टाटा प्रोजेक्‍टस या कंपनीस देण्यात आले असून जून 2016 पासून हे काम शहरात सुरू आहे. असे असतानाच; दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या अंदाजपत्रकात अनेक नगरसेवकांनी प्रभागातील रस्त्यावर एलईडी दिवे बदलण्यासाठी तसेच नवीन दिवे बसविण्यासाठी तरतूद उपलब्ध करून घेतली आहे. या तरतूदीमधून क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही दिवे खरेदी करून ते परस्पर बदलले जात आहे. पण प्रत्यक्षात टाटा प्रोजेक्‍ट्‌स कंपनीकडूनच हे काम होणे आवश्‍यक असताना, शहरात ही कंपनी आणि क्षेत्रीय कार्यालयांकडूनही ही कामे होत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन या पुढे कोणत्याही अभियंत्यानी अथवा क्षेत्रीय कार्यालयांनी नवीन एलईडी खरेदी करू नयेत तसेच नवीन पथदिवे अथवा एलईडी बसविण्याचे काम असल्यास मुख्यखात्याकडून मान्यता घेऊन संबधित कंपनीकडूनच ते दिवे बसविले जावेत असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
——————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)